सांगली : सांगली शहरासह खानापूर तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून चोरीचे दागिने, मोपेड असा १७.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
मंगेश येताळा भारते (वय २७, रा. माधळमुठी, ता. खानापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना एक तरूण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीतील लोकल बोर्ड कॉलनी येथे येणार असल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता.
त्यावेळी एका मोपेडवरून (एमएच १० डीई ४४५२) एक तरूण तेथे आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची तपासणी केल्यानंतर डिकीमध्ये दागिने सापडले. त्याबाबत चौकशी केल्यानंतर त्याचे साथीदार बबलुसिंग टाक, संगतसिंग कल्याणी यांनी कवलापूर तसेच सांगलीत चोरी केली होती. त्यातील दागिने विक्री करण्यासाठी त्याच्याकडे दिल्याची कबुली दिली. त्यानंतर मोपेड, दागिने जप्त करून त्याला अटक करण्यात आली. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडून सांगली शहरातील दोन, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन, विटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक असे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल ऐनापुरे, सागर लवटे, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, बाबासाहेब माने, अमर नरळे, उदय माळी, सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.