उमदी : संख (ता. जत) येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा ४८ तासांच्या आत खून करु अशी धमकी उमदी (ता. जत) येथील सुमित नाटीकर याने दिली आहे. यामुळे महसुल विभागात खळबळ उडाली असून उमदी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाटीकर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर खुनाची धमकी पाठविली आहे.
सुमित नाटीकर याचा त्याच्या भावकीतील लोकांशी शेतातील रस्त्यावरून वाद होता. हा वाद अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट होता. त्यांनी शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. सर्वांचे जबाब घेऊन एकाच सर्व्हे क्रमांकामध्ये सर्वांची शेती असल्याने नाटीकर याच्या शेतातून सामाईक रस्ता देण्याचा आदेश ४ महिन्यांपूर्वी काढला होता. याचा राग मनात धरून नाटीकर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर धमकीचे पत्र पाठविले. ४८ तासांच्या आत मागाडे यांचा खून करतो असा मेल केला. मागाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार उमदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नाटीकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उमदी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.