महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच महाराष्ट्रात सत्तांतर घडवावं लागेल असंही विधान केलं आहे. या सर्वांवर गंभीर आर्थिक गुन्हे आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हरुन अल रशीदची पोरं म्हटलं.
मातोश्रीवर झालेल्या मराठा आंदोलकांमध्ये भाजपाचे पदाधिकारी होते असा आरोप होत असल्यासंबंधी ते म्हणाले की, "ही भाजपाचा कारस्थानं असतात. याला राजकारणातला फडणवीस टच म्हणतात. महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही. जर महाराष्ट्र सुखात, शांततेत नांदवायचा असेल तर सत्तांतर घडवावं लागेल. आणि हा जो कचरा आहे या सर्वांवर गंभीर आर्थिक गुन्हे आणि सत्तेच्या गैरवापराबद्दल खटले दाखल करावे लागतील".
'हरुन अल रशीदची पोरं आहेत'
"एकनाथ शिंदे यांनी मौलवीचा वेष धारण करुन दिल्लीत प्रवेश केला होता. अनेक वेषांतरं केल्याचं त्यांचेच लोक सांगत आहेत. भुजबळांनी सीमाभागातील लढ्यासाठी वेषांतर केलं होतं आणि महाराष्ट्राला ते आवडलं होतं. त्यांनी महाराष्ट्रासाठी लाठ्या खाल्ल्या होत्या, तुरुंगवास भोगला होता. अशाप्रकारे राष्ट्रासाठी, महाराष्ट्रासाठी भूमिका वठवण्यात आल्या आहेत. गेल्या अडीच- तीन वर्षात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार नकली दाढी मिश्या टोप्या लावून वेषांतर करुन फिरत आहेत. ही हरुन अल रशीदची पोरं आहेत. तो अशी वेषांतरं करत फिरायचा," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
"राष्ट्रीय सुरक्षा कशाप्रकारे धोक्यात येऊ शकेल याचं उत्तम उदाहरण एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी देशाला दाखवलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही या कटात सहभागी असू शकतात. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना ते काय करत होते? ते जेम्स बाँड आहेत ना? त्यांना मुंबई, दिल्लीतील विमानतळांची सुरक्षा धोक्यात असतानाही कळलं नाही," अशी विचारणाही त्यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.