52 भूखंड आणि 6 बहुमजली इमारती.. उत्पादन शुल्कच्या सहाय्यक आयुक्ताकडे काय काय सापडलं!
ओडिशातील उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अभियंत्याची डोळे दिपविणारी मालमत्ता दक्षता अधिकाऱ्यांच्या छाप्यात उघड झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच या अभियंत्यांच्या मालकीचे ३४ भूखंड, घरे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आणखी ५२ भूखंड व सहा बहुमजली इमारतीही शोधण्यात आल्या. रामचंद्र मिश्रा असे या अभियंत्याचे नाव असून ते उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त आहेत.
या अभियंत्याकडे उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती असल्याची तक्रार आल्यानंतर दक्षता अधिकाऱ्यांनी हे छापासत्र राबविले. यात दहा पोलिस उपअधीक्षक, १५ निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. मिश्रा यांच्याशी संबंधित १० ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या वेळी मिश्रा व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचे ५२ भूखंड सहा बहुमजली इमारती, २३० ग्रॅम सोने आदी मालमत्ता सापडली.
त्याचप्रमाणे, शेअर, म्युच्युअल फंड आदींमधील गुंतवणुकीचाही तपास सुरू आहे. मिश्रा यांची सर्व मालमत्ता उघड झाल्यानंतर त्यांच्या बेहिशोबी संपत्तीचे एकूण मूल्य आणखी वाढण्याचा अंदाजही दक्षता अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मिश्रा यांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. विशेष दक्षता न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटअंतर्गत ही कारवाई करण्यात आली, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
आठ महिन्यांत निवृत्ती
रामचंद्र मिश्रा ३० वर्षांपूर्वी उपनिरीक्षक म्हणून उत्पादन शुल्क विभागात दाखल झाले. त्यानंतर, त्यांना सहआयुक्त पदापर्यंत बढती मिळाली. ते आठ महिन्यांमध्ये निवृत्त होणार होते. मात्र, दक्षता अधिकाऱ्यांच्या छाप्यामुळे त्यांची बेहिशोबी मालमत्ता उजेडात आली आहे. आपण गैरमार्गाने संपत्ती मिळविली नसल्याने सांगत त्यांनी आरोप फेटाळले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.