Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वय 48 वर्षे, 165 मुलांचा बाप! प्रोफेसर नगेल ' फादर्स डे ' दिवशीही झाला बाप

वय 48 वर्षे, 165 मुलांचा बाप! प्रोफेसर नगेल ' फादर्स डे ' दिवशीही झाला बाप 


ब्रुकलीनमध्ये राहणारा 'तो'. वय ४८ वर्षे, त्याला १६५ मुलं आहेत! त्याच्या मुलांच्या आया जगभरात आहेत. त्यातील कुणी नुकताच बाळाला जन्म दिला आहे, तर कुणाची डिलिव्हरी जवळ आली आहे. हा सगळा तपशील वाचून कोणीही बुचकळ्यात पडेल.

एक व्यक्ती इतक्या मुलांचा बाप कसा असू शकेल? तो त्यांचं पालकत्व कसं निभावत असेल? पण त्याचं हे 'बाप'पण जरा वेगळं आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी १६५ मुलांचं वडीलपण स्वतःच्या नावावर नोंदवणारा हा 'स्पर्मिनेटर' आहे. म्हणजे तो आपले स्पर्म (शुक्राणू) स्पर्म बँकेला दान करतो. त्याने दान केलेल्या शुक्राणूंच्या मदतीने कित्येक स्त्रियांचं आई होण्याचं स्वप्न साकार झालं आहे. कित्येक जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे.

हा स्पर्म डोनर आहे अमेरिकेतल्या ब्रुकलीन इथला. अरी नगेल त्याचं नाव. या प्रक्रियेद्वारे १६५ मुलांचा बाप झालेल्या नगेलने यापैकी दोन मुलांसोबत नुकताच 'फादर्स डे' साजरा केला. तो म्हणतो, 'मी आता बहामामध्ये एका शानदार क्रूझवर सुट्या घालवीत आहे. माझ्या सोबत माझी दोन मुलं आहेत. पहिला मुलगा टेलर जो २० वर्षांचा आहे आणि ३३ वा मुलगा टोपाझ जो ७ वर्षांचा आहे. मी आता स्पर्म डोनेटिंग थांबवणार आहे. कारण मी जरी तब्येतीने धडधाकट असलो तरी पुढच्या मुलांना आता ऑटीझमचा (स्वमग्नता) त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.' त्याने दिलेल्या माहितीवरून नगेलचा वैद्यकीय शास्त्राचाही चांगला अभ्यास असल्याचं लक्षात येतं.
अमेरिका, कॅनडा, आशिया, आफ्रिका, युरोप आदी विविध ठिकाणच्या महिला नगेलने दान केलेले शुक्राणू वापरून गरोदर राहिल्या असून, लवकरच त्या मुलांना जन्म देणार आहेत. जुलैमध्ये झिब्माब्वे, लाँग आइसलॅण्ड येथील तर ऑगस्टमध्ये इस्रायल आणि विवनमधील महिलांची प्रसूती होणार आहे. येणाऱ्या काळात तो कृत्रिम गर्भधारणा केंद्रांना कबूल केल्याप्रमाणे शुक्राणू दान करणार आहे.

तो म्हणतो, 'एकावेळी एवढ्या मुलांचा बाप असणं ही किती आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. या मुलांचे बाप देखील त्यांच्यावर भरभरून प्रेम करो, त्यांना चांगले नागरिक म्हणून जगासमोर उभे करो, ही माझी इच्छा आहे आणि असे झाले तर यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट काय असू शकेल? नगेल आपल्या अनेक मुलांना प्रत्यक्षात भेटला आहे, त्यांच्याशी संवाद साधला आहे. तो म्हणतो, यातल्या अनेक मुला-मुलींच्या आपण संपर्कात असून, यातली ५६ मुलं न्यूयॉर्कमध्ये, २३ मुलं न्यू जर्सीमध्ये, तर १३ मुलं कनेक्टिकट या अमेरिकेतील राज्यांमध्ये आहेत. नगेल आपल्या मुलांशी संपर्क ठेवतो ही बाब काही मुलांच्या आयांना आवडते, तर काही आयांना अजिबात नाही. अनेक आया अशाही आहेत की, त्यांना पुढे नगेलचं तोंडही पाहण्याची इच्छा नसते. नगेलची स्वतःची याबाबतची कोणतीही सक्ती नसते. तो ते सर्व त्या मुलांच्या पालकांवर सोडतो.

बरीचशी मुलं थोडी मोठी झाली की आपले वडील कोण? असा प्रश्न विचारायला लागतात. तेव्हा मात्र काही आयांना माझी ओळख दिलासादायक वाटते, असं नगेल सांगतो. नगेल म्हणतो, बाप होणं एक वेळ सोपं असेल, पण ते निभावणं ही मात्र अवघड गोष्ट आहे. स्पर्म दान करुन वडील झालेल्या नगेलला आपल्या मुलांशी असलेली नाळ तोडणं शक्य नाही. आपल्या सर्व मुलांकडून त्याच्या फार नाही; पण माफक अपेक्षा आहेत. नगेल याबाबत आपल्या वडिलांबद्दल, त्यांच्या संस्कारांबद्दल सांगतो. जुनाट विचारांच्या कुटुंबात नगेलचं बालपण गेलं. आपल्या वडिलांनी ज्या प्रेमाने आपल्याला मोठं केलं ते फार महत्त्वाचं असल्याचं नगेल मानतो. आपल्या वडिलांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेली मूल्यं आपल्या मुलांपर्यंत पोहोचवण्याची नगेलची इच्छा आहे.
नगेलने आपल्या अपत्यांची पद्धतशीरपणे नोंद ठेवली आहे. एका 'स्प्रेडशिट फाइल'मध्ये मुला-मुलींची नावं, जन्मतारीख, ठिकाण, पत्ता, फोन नंबर आदी तपशील सविस्तरपणे लिहिलेले आहेत. त्यांचे फोटोदेखील त्याने त्याच्या फाइलला लावून ठेवलेले आहेत. नगेल म्हणतो की, 'मला एखाद्या 'फादर्स डे'ला माझ्या या सगळ्या मुलांसोबत, तसेच त्यांच्या आयांसोबत ब्रोक्स झू येथे भेट घ्यायची इच्छा आहे.' 

नगेलला वाटतो स्वतःचा अभिमान! 
अरी नगेल किंगबोरो कम्युनिटी कॉलेजमध्ये गणिताचा प्रोफेसर आहे. स्पर्मिनेटर ही त्याची ओळख तो अभिमानाने मिरवतो. महिलांना मातृत्वाचे सुख मिळवून देण्यासाठी तो धडपडतो. नुकत्याच झालेल्या 'फादर्स डे'च्या दिवशी त्याच्या १६५ व्या मुलाचा जन्म झाला. तो आनंद त्याने बहामा येथे कूावरून साजरा केला. नगेल जे करतो आहे त्याला जगभरातून नैतिक पाठिंबा मिळतो आहे. नगेलही त्याबाबत खुश आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.