Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

1 जुलैपासून तुम्हाला रेशनवर मोफत धान्य मिळणार नाही

1 जुलैपासून तुम्हाला रेशनवर मोफत धान्य मिळणार नाही


केंद्र सरकारकडून दर महिन्याला देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य दिलं जातं. तुम्हालाही या योजनेतून मोफत धान्य मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला रेशन कार्डाचं ई-केवायसी पूर्ण करावं लागेल. त्यासाठी 30 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे रेशनकार्डधारक या मुदतीपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत त्यांना जुलै महिन्यात मोफत धान्य मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ई-केवायसीची प्रक्रिया रेशन दुकानात मोफत पूर्ण करता येणार असल्याचंही या वेळी सांगण्यात आलं आहे.

मोफत धान्य योजनेतील गैरप्रकार बंद करुन ती अधिक पारदर्शक करण्यासाठी तसेच लाभार्थींना वेळेवर धान्य मिळावं यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलं आहे. सध्या किती तरी कुटुंबांच्या रेशन कार्डांवरुन मृत सदस्यांची नावं वगळण्यात आलेली नाहीत. त्यांच्या नावाचं धान्य अजूनही या कुटुंबांकडून घेतलं जात असल्याचं अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

काही ठिकाणी लाभार्थी आपल्या मूळ पत्त्यावर राहात नसून इतरत्र राहात आहेत. त्यामुळे त्यांच्या मूळ पत्त्यावर कोणी तरी त्यांच्या नावावरील मोफत धान्य घेऊन जात आहेत. नवीन पत्त्यावर लाभार्थी स्वतःसाठीही धान्य घेत आहेत. असे प्रकार बंद करण्यासाठी ई-केवायसी अपडेट न केल्यास धान्य न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ई-केवायसी अपडेट करण्यासाठी रेशनकार्डधारक कुटुंब प्रमुखासह घरातील सर्व सदस्यांचे बायोमेट्रिक तपशील म्हणजेच बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. मोफत धान्य दुकानातील कोठेदार किंवा डेपो धारकाकडून ही प्रक्रिया केली जाईल. त्यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ज्या मशिनवर अंगठा घेऊन सध्या धान्य वाटप केलं जातं त्याच मशिनच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जर एखाद्या कुटुंबाच्या रेशनकार्डावर पाच नावं असतील आणि त्यापैकी एखादा सदस्य आपलं बायोमेट्रिक देत नसेल तर त्याचं नाव कार्डावरुन कमी केलं जाईल. जेवढ्या सदस्यांचं केवायसी अपडेट होईल तेवढ्यांचं धान्य त्या कुटुंबाला दिलं जाईल. ई-केवायसी अपडेट करण्यासाठी रेशनकार्ड धारकांना रेशन कार्डाचा नंबर आणि आधार कार्ड नंबर सांगावा लागेल.

रेशन कार्डवर नाव असलेल्या सगळ्यांच्या बोटांचे ठसे द्यावे लागतील. कुटुंब प्रमुखाच्या एकट्याच्या केवायसीवर यापुढे सर्वांचं धान्य मिळणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमचं आधार कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे. त्यावर नोंदवण्यात आलेल्या बायोमेट्रिक तपशिलांशी पडताळणी करुनच रेशन कार्ड अपडेट करण्यात येईल. त्यामुळे मोफत धान्य योजनेचे लाभ हवे असल्यास सगळ्यात आधी आधार कार्ड अपडेट करणं महत्त्वाचं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.