खुनाच्या गुह्यात संशयित आरोपी असलेल्या वृषभ ऊर्फ मगर विजय साळोखे (वय 21, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याची कळंबा कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी दहशत पसरवण्यासाठी त्याची मोटारीतून काढलेल्या मिरवणुकीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी वृषभ साळोखेसह अनिकेत किरण शिरदवाडे, पृथ्वीराज ऊर्फ माम्या विलास आवळे (दोघे रा. वारे वसाहत), अवधूत किरण खटावकर (रा. हनुमाननगर), धीरज राजेश शर्मा, रोहित चौगुले (रा. जगतापनगर, तिघेही रा. पाचगाव), आदित्य कांबळे, विजय साळोखे (दोघे रा. रामानंदनगर) अशा आठजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील शिरदवाडे आणि खटावकर यांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल सागर विलास डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ साळोखे हा एका खुनाच्या गुह्यात संशयित आरोपी असून, त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुह्यात जामीन मंजूर झाल्यानंतर कळंबा मध्यवर्ती कारागृहातून 19 मार्चला बाहेर येताच, त्याच्या समर्थकांनी कारागृहाबाहेर त्याचे स्वागत करून दुचाकी व चारचाकीतून मिरवणूक काढली. गुंडांच्या या मिरवणुकीचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करून विरोधी गटावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी संशयितांवर कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.