बच्चू कडूंचं खळबळजनक वक्तव्य; "राहुल गांधींनी सावरकरांबद्दल पुरावे दिले होते, मात्र भिडेंनी."
नागपूर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नाही. तर गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. या प्रकरणावर आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे स्वातंत्र्याबद्दल संशय निर्माण करत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
संभाजी भिडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले, “कोणत्याही महापुरुषाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही. मध्यंतरी राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. मात्र, राहुल गांधी यांनी हे विधान करत असताना पुरावे दिले होते. परंतु संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजी बद्दल केलेलं विधान अत्यंत निंदनीय आहे.
संभाजी भिडे असू द्या नाही तर कोणीही असू द्या, महापुरुषांबद्दल बोलणाऱ्यांना आडवं घेतलं पाहिजे. भिडे गुरुजी स्वातंत्र्याबद्दल संशय निर्माण करत आहे.” दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “संभाजी भिडे यांना राज्य सरकार संरक्षण देत आहे.
कारण संरक्षणाशिवाय संभाजी भिडे महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करू शकत नाही. भिडेंनी आतापर्यंत महात्मा गांधी, महात्मा फुले, साईबाबा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तरीही सरकार यावर कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “संभाजी भिडे महापुरुष आणि देव देवतांचा अपमान करत आहे. राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार असताना देव देवतांचा अपमान होत आहे. सरकारला महापुरुषांचा अपमान मान्य आहे का? सरकार संभाजी भिडे यांना संरक्षण का प्रदान करत आहे?”
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.