रक्तातील प्लेटलेट्स वाढविण्यासाठी किवी पेक्षा पेरू उपयुक्त !
डेंगीच्या आजारात रक्तातील रक्तबिंबिका (पेशी-प्लेटलेट्स) वाढविण्यासाठी किवी या फळापेक्षा पेरू अधिक उपयुक्त ठरत असल्याचे तुलनात्मक अभ्यासातून पुढे आले आहे. पुणे येथील विश्वराज हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी सुमारे १०० रुग्णांवर केलेले हे संशोधन 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड अँड न्युट्रिशनल सायन्सेस'मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
विश्वराज हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे म्हणतात, ''कोणत्याही विषाणूजन्य आजाराला प्रतिकार करण्यासाठी फळांना खूप महत्त्व असते. क-जीवनसत्त्व हे रक्तबिंबिका वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. डेंगीमध्ये रक्तातील प्लेटलेट्स (रक्तबिंबिका) कमी झाल्यावर बहुतांश डॉक्टर आणि आहारतज्ज्ञाकडून किवी फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र परदेशी असल्यामुळे किवी हे फळ अन्य स्थानिक फळांच्या तुलनेत महाग असते. ते खाणे सर्वांनाच परवडू शकेल असे नाही. म्हणूनच किवीपेक्षा क जीवनसत्त्व अधिक असलेल्या पेरू आणि आवळा या फळांबाबत तुलनात्मक अभ्यास केला. त्यातही आवळा हा ठरावीक हंगामातच उपलब्ध असतो. म्हणूनच डेंगीच्या रुग्णांमध्ये पेशी वाढविण्यासाठी किवी आणि पेरू यांच्या प्रभावाचा तुलनात्मक अभ्यास केला.'' या संशोधनासाठी विश्वराज हॉस्पिटल संशोधन विभागामधील डॉ. तबरेज पठाण, कोमल दुबाल आणि नम्रता सुर्वे यांनी सहभाग घेतला होता.
असे झाले संशोधन ः
डेंगीमुळे पेशी कमी झालेले १०० रुग्ण निवडले गेले ५० रुग्णांना हिरवे किवी फळ, तर ५० रुग्णांना पांढरा गर असलेले पेरू खाण्यास सांगितले रोज त्यांच्या रक्तबिंबिका प्लेटलेट्सची मात्रा म्हणजेच पेशींची संख्या तपासण्यात आली. या संशोधनामध्ये सर्व वयोगटांतील रुग्ण होते, जवळपास सर्वच रुग्णांना औषधे व आहारही जवळपास एकसारखाच देण्यात आला. मिळालेल्या निरीक्षणांचे तुलनात्मक सांख्यिकीय विश्लेषण केले गेले.आहारात पेरू घेणाऱ्या रुग्णांच्या गटामध्ये रक्तबिंबिका (प्लेटलेटची संख्या) वाढीची प्रवृत्ती दिसत होती, तर किवी गटामध्ये पेशी वाढण्याची प्रथम कमी प्रवृत्ती, नंतर वाढण्याची प्रवृत्ती आणि पुन्हा कमी होण्याची प्रवृत्ती होती. म्हणजेच पेशी वाढण्यामध्ये अनियमितता होती. म्हणूनच किवी गटाच्या रुग्णांचा रुग्णालयात डिस्चार्जदेखील उशिरा झाला. त्याउलट पेरू गटामधील रुग्णांच्या पेशी लवकर वाढल्यामुळे त्यांचा डिस्चार्ज तुलनेने लवकर झाला.- डॉ. स्वाती खारतोडे, आहारतज्ज्ञ आणि संशोधक
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.