औरंगाबादमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यावर गोळीबार, आरोपी सीसीटीव्हीत कैद
जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरून गेले असतांना, आता राज्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे. औरंगाबाद शहरात गोळीबाराची घटना घडली असून, एका स्वच्छता कर्मचाऱ्यावर हा गोळीबार करण्यात आला आहे. मात्र, सुदैवाने यात कोणेही जखमी झालेला नाही. ऐनवेळी मान बाजूला केल्याने हा स्वच्छता कर्मचारी थोडक्यात बचावला आहे. प्रभाकर अहिरे असे गोळीबार करण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारे प्रभाकर अहिरे यांच्यावर घरात घूसुन गोळीबार करण्यात आला आहे. दोन तरुणांनी भरदिवसा घरात घुसून हा गोळीबार केला आहे. मात्र, अहिरे यांनी गोळीबार झाल्यावर मान खाली करून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोळी भीतीला जाऊन लागली. तर, गोळीबार करून दोन्हीही तरुण तेथून पळून गेले. विशेष म्हणजे गोळीबार करणारे हे दोन्ही तरुण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यात आला आहे.
थोडक्यात जीव वाचला...
औरंगाबाद महानगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारे प्रभाकर अहिरे आपल्या घरात बसले होते. दरम्यान, याचवेळी दोन तरुण अचानक त्यांच्या घरात आले. अहिरे यान काही कळायच्या आत आलेल्या दोन्ही तरुणांपैकी एकाने थेट पिस्तुल काढत अहिरे यांच्या दिशीने रोखली. पिस्तुल पाहून अहिरे प्रचंड घाबरले. दरम्यान, याचवेळी हातात पिस्तुल असलेल्या तरुणाने थेट अहिरे यांच्यावर गोळीबार केला. मात्र, याचवेळी अहिरे यांनी मान खाली केल्याने गोळी थेट भीतीला जाऊन लागली. त्यानंतर दोन्ही तरुण लगचेच तेथून निघून गेले. अहिरे यांनी वेळीच आपली मान खाली केल्याने त्यांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु...
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे.पोलिसांनी घटनास्थळचे पंचनामा केला आहे. तर दोन्ही आरोपींचा सीसीटीव्हीत कैद झालेल्या व्हिडिओच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी पोलिसांकडून पथक नियुक्त करण्यात आले असून, हे पथक आरोपींचा शोध घेत आहे. मात्र, भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.