महात्मा फुले- आयुष्यमान भारत अंतर्गत 1356 आजारांवर होणार उपचार; सर्व शिधापत्रिकाधारकांना योजना लागू
सांगली : महात्मा जोतिराव फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री या दोन्ही जनआरोग्य योजनांच्या एकत्रिकरणाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या आरोग्य योजनेअंतर्गत आता १३५६ आजारांवर उपचार केले जाणार आहेत. यासमवेतच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र शासनाची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण २०२० पासून राज्यात करण्यात आले आहे. या योजनेचे आता विस्तारीकरण करण्यात येऊन जास्तीत जास्त जनतेला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नवीन तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.
पाच लाखांपर्यंतचे आरोग्य संरक्षण
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपये, तर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपये एवढे आरोग्य संरक्षण मिळते. दोन्ही योजनांच्या एकत्रिकरणामुळे सर्वांनाच प्रतिकुटुंब प्रतिवर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळणार आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत समाविष्ट न होणाऱ्या लाभार्थ्यांचा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येणार आहे.
मूत्रपिंड शस्त्रक्रियेची मर्यादा साडेचार लाख रुपये
मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये असलेली उपचार खर्च मर्यादा प्रतिरुग्ण अडीच लाख रुपयांवरून साडेचार लाख रुपये करण्यात आली आहे.
१३५० रुग्णालये अंगीकृत
महात्मा जोतिराव फुले व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य या एकत्रित योजनेमध्ये अंगीकृत रुग्णालयांची संख्या सध्या एक हजार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागात सीमेलगतच्या महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांत १४० व कर्नाटक राज्यातील ४ जिल्ह्यांत १० अतिरिक्त रुग्णालय अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. त्याशिवाय २०० रुग्णालये अंगीकृत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अंगीकृत रुग्णालयांची संख्या १३५० होणार आहे.
योजना संपूर्णपणे हमी तत्त्वावर
या योजना संपूर्णपणे हमी तत्त्वावर राबविण्यात येणार आहेत. म्हणजे उपचारांचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटी थेट अंगीकृत रुग्णालयांना प्रदान करेल. याची यंत्रणा कार्यान्वित होईपर्यंत सध्याच्या पद्धतीनुसार (विमा आणि हमी तत्त्वावर) सुधारित तरतुदींनुसार योजना राबविण्यात येईल. शासकीय रुग्णालयांना या योजनेतून मिळणारा पैसा संबंधित रुग्णालयांकडेच ठेवण्यास परवानगी देण्यात येईल.
अपघाताची खर्च मर्यादा एक लाखापर्यंत
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेच्या तरतुदीमध्ये सुधारणा करून रस्ते अपघातासाठीची उपचारांची संख्या ७४ वरून १८४ अशी वाढविली आहे, तर उपचाराची खर्च मर्यादा तीस हजार रुपयांऐवजी एक लाख रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिवाय या योजनेचा समावेश महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्र किंवा देशाबाहेरील रुग्ण यांचाही समावेश यामध्ये करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.