स्त्री ही स्त्री असते मग ती मणिपूरची असो वा बंगालची ! डॉक्टर. वीणा खाडीलकर
गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर येथील बातम्यांमुळे देशाचे लक्ष त्या राज्याकडे केंद्रित झाले आहे. यात खंत याचीच आहे की, पेटलेल्या मणिपूरच्या आगीवरून राजकारण चालू आहे. त्यात काही समाजकंटकांनी महिलांची काढलेली नग्न धिंड मनाला वेदना देऊन गेली. दोन समाजात चालू असलेला संघर्ष असे मणिपूर येथील संघर्षाकडे पाहिले गेले. मात्र, जेव्हा महिलांवरील अत्याचाराची माहिती उघड झाली, तेव्हा मात्र मणिपूर येथील वादाने वेगळेच वळण घेतले आहे; याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याशिवाय राहता येत नाही. हे प्रकरण उघड झाल्यावर बंगाल राज्यातही एका महिलेला विवस्त्र करून काही महिलाच तिला अमानुषपणे मारहाण करत असल्याचीही क्लिप सोशल मीडियावर आली. तेव्हा मात्र मणिपूर घटनेवरून आकाशपाताळ एक करणारे शांत बसले. असे का? मणिपूर आणि बंगाल ही दोन्ही राज्ये भारतातीलच.
मग असा भेदभाव का? स्त्री मग ती कोणत्याही राज्यातील असो तिच्यावर झालेला अन्याय हा दुःखदच असतो. त्यातही उजवे, डावे करणारे वैचारिक पातळीवर किती कोत्या मनोवृत्तीचे आहेत ? ज्यांना पीडित स्त्रीला न्याय मिळाला पाहिजे याहीपेक्षा राजकारण करण्यात जास्त रस आहे. मणिपूर येथील अशांतीचा गैरफायदा राजकीय दृष्ट्या घेतला जाऊन त्यावर आपापल्या पोळ्या भाजणे यापेक्षा दुर्दैव ते काय? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री एक महिला आहेत. त्यांच्या राजकीयविरोधात राज्यांत जराही खुट झाले तरी त्या तोंडसुख घेण्याची संधी सोडत नाहीत.समोरचा कुठे चुकतो ? आणि मी त्याला कधी कात्रीत पकडते ? इतकी घाई घटनेवर प्रतिक्रिया देताना असते. पण जेव्हा स्वतःच्याच राज्यात एका महिलेला विवस्त्र केले जाते. तेव्हा यांच्याकडून काही प्रतिक्रिया येतेय का ? याची डोळ्यात तेल घालून वाट पाहावी लागते. ट्विटरसारख्या सामाजिक माध्यमावर त्या लज्जास्पद प्रसंगाच्या क्लिप्स येतात. त्या क्लिप्स पूर्ण जग बघते. पण एका राज्याच्या महिला मुख्यमंत्री यांनी ती पाहिली नाही किंवा त्यांच्या राज्यातील पोलिसांनी त्यांना घटनेची माहिती दिली नाही. असे शक्य तरी असेल का ? समाजकंटक मग तो मणिपूर, बंगालचा असो वा देशातील कोणत्याही राज्यांतील असो तो समाजाचा शत्रूच असतो. त्याच्याकडे पाहताना कोणत्या राज्यात कोणाचे सरकार आहे या चौकटीत राहून पाहू नये. त्याला तातडीने शिक्षा कशी होईल असा विचार केला तर महिलांच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा विचारसुद्धा होणार नाही. 'द केरला स्टोरी' , 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटांत पाहिले असेलच कशा प्रकारे महिलांवर अत्याचार झाले. हे भयावह वास्तव काही जणांच्या पचनी पडले नाही. त्यावरून त्यांनी असे काही घडलेच नाही या थाटात बडबड करून सत्य जाणून घेण्यापासून समाजाला रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण ते हे विसरले की समाज झोपलेला नसून तो जागा आहे. त्यात सोशल मीडियामुळे तर अधिकच सतर्क झाला आहे.सत्य काय असत्य काय याची शहानिशा करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. कोणी त्या राज्यांत असलेल्या मित्र परिवाराला संपर्क करून सत्य जाणून घेईल तर कोणी नोकरी - शिक्षण - व्यवसाय या निमित्ताने त्या राज्यात असेल अथवा आता राहात असलेल्या ठिकाणी कोणी तिकडचे शेजारी असतील त्यांच्याकडून माहिती जाणून घेईल. माहिती जाणून घेण्याची ही काही उदाहरणे आहेत. त्यामुळे आम्ही बोलू तेच सत्य या भ्रमात कोणी राहता कामा नये. हे सर्व सांगण्याचे कारण हेच आहे, 'जेव्हा सामाजिक शांती भंग पावते तेव्हा सार्वजनिक मालमत्ता, वैयक्तिक मालमत्ता यांची हानी तर होतेच. पण स्त्रीच्या अब्रूवर घाला घालून सामाजिक वातावरण अधिक कलुषित करण्याकडेही कल असतो.' यामध्ये स्त्री मन आणि शरीर यांना होणाऱ्या यातना शब्दांत मांडण्याच्याही पलिकडे असतात. ज्यांना या सर्वांचा मानसिक धक्का बसतो. त्यांची व्यथा तर जिवंतपणी मरण अशीच असते.
स्त्री मग ती शहरी भागातील असो किंवा ग्रामीण भागातील. दोघांनाही कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यासाठी त्यांना नोकरी - व्यवसाय यात पदार्पण करावे लागते. कुटुंबाच्या जबाबदारीसह स्वसंरक्षणाचीही जबाबदारी स्त्रीवर आली आहे. कारण स्त्री अत्याचाराच्या घटना प्रतिदिन वाढत आहेत. याला अटकाव घालण्यासाठी प्रत्येक स्त्रीने वेळ काढून आवर्जून स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. कारण बाका प्रसंग हा कोणावर कधी ओढवेल हे सांगता येत नाही. प्रसंग घडत असताना माणुसकी या नात्याने म्हणूनसुद्धा कोणीही वाचवण्यासाठी पुढे येत नाही. तर केवळ बघ्याची भूमिका घेतली जाते. हल्ली तर अनेकांना मोबाईलमध्ये प्रसंग चित्रित करून तो 'सर्वप्रथम' प्रसारित करण्याची घाई झालेली असते. कोणीतरी जिवाच्या आकांताने साहाय्य मिळावे म्हणून साद घालत असले तरी ती अशांना ऐकू जात नाही. माणुसकी लोप पावली म्हणतात ती अशीच.
जगातील सर्व देशांत भारत हाच एकमेव देश असा आहे जिथे स्त्रीची पूजा होते. तिला देवतेचे स्थान दिले आहे. इतका मानसन्मान स्त्रीला या भूतलावर केवळ आणि केवळ भारतातच आहे. म्हणजे भारतीय संस्कृती किती उच्च विचारसरणीची आहे. हे येथे लक्षात येते. 'बाईपण भारी देवा' या मराठी चित्रपटाने केवळ महिलांची नव्हे तर पुरुषांचीही मने जिंकली आहेत. हे या चित्रपटाला मिळत असलेल्या उस्फूर्त प्रतिसादावरून कळते. हेच 'बाईपण' तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यास वेळप्रसंगी 'भारी' पडायला हवे. महिला सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्या तर मी ही माझ्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांचा योग्य समाचार घेऊ शकते आणि जन्मभर पुरेल अशी अद्दल घडवू शकते असा आत्मविश्वास देश इतर महिलांत निर्माण होईल. मणिपूर असो की बंगाल की राजस्थान. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे!!
- डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.