Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नागपूरच्या दोन व्यावसायिकांची कोंढाळीत गोळ्या झाडून हत्या

नागपूरच्या दोन व्यावसायिकांची कोंढाळीत गोळ्या झाडून हत्या


नागपूर:  वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांची हत्या करण्यात आली. या चार खुनांनी शहर हादरले असून यातील पहिल्या घटनेत शहरातील दोन व्यवसायिकांची गोळ्या झाडून हत्या करून त्यांचे मृतदेह जाळून नदीत फेकण्यात आले. हा थरार कोंढाळी येथील फार्महाऊसवर मंगळवारी २५ जुलैला घडला.

दुसऱ्या घटनेत एका अल्पवयीन मुलाकडून कचरा वेचणाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. तर तिसऱ्या घटनेत घरगुती वादातून संतापलेल्या भावाने आजारी बहिणीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. यात बहिणीचा मृत्यू झाला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री घडली.

निरालाकुमार सिंग (४२, रा. पारडी, एच.बी. टाऊन) आणि अंबरीष गोळे (४०, रा. सोनेगाव) अशी पहिल्या घटनेतील मृत व्यावसायिकांची नावे आहेत. झटपट पैसे कमावण्याच्या लालसेत त्यांना जीव गमवावा लागल्याची चर्चा असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ओंकार महेंद्र तलमले(२५, रा. स्मृती लेआऊट, मरियमनगर), हर्ष आनंदीलाल वर्मा, (२२, रा. वाडी), दानेश दुर्गाप्रसाद शिवपेठ (२१, रा. गोधनी), लकी संजय तुर्केल (२२, रा. मरियमनगर) आणि हर्ष सौदागर बागडे (१९, रा. दत्तवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. सीताबर्डी आणि सोनेगाव पोलिस ठाण्यात दाखल बेपत्ता प्रकरणांच्या तपासात सीताबर्डी पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना कोंढाळी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निरालासिंग यांचा ऑनलाइन व्यवसाय होता तर अंबरीष गोळे हे बांधकाम व्यावसायिक होते. दोघेही मित्र होते. प्रत्येक शनिवार वा रविवारी पार्टीसाठी ते कोंढाळीच्या फार्महाऊसवर जायचे.

२५ जुलैला दोघेही चिटणवीस सेंटर येथे भेटले. तेथे आरोपीही होते. मोठी ‘डिल’ करायची असल्याने सर्व जण कोंढाळी जवळील रिंगणाबोडी शिवारातील संजय तुर्केल यांच्या फार्महाऊसवर गेले. आरोपींना त्यांच्याकडून दीड कोटींचा डीडी हवा होता.

त्याचा ते अधिक परतावा देणार होते. परंतु, पैशावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि आरोपींनी दोघांवरही गोळ्या झाडून त्यांच्याजवळील दीड कोटींचा डीडी हिसकावला. त्यानंतर कोंढाळी परिसरात दोघांचेही मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. दोघांचे अर्धवट जळालेले मृतदेह कारमधून नेत वर्धा नदीत फेकून दिले. अंबरीष गोळे यांचा मृतदेह तिवसाजवळील एका गावात सापडला.

भारवाडी हद्दीत सापडला मृतदेह

बेपत्ता व्यक्तींचा हत्या करून आरोपींनी मृतदेह वर्धा नदीपात्रात फेकल्याच्या माहिती मिळाल्यानंतर आज शोधमोहिम हाती घेण्यात आली. एकाचा मृतदेह भारवाडी येथे नदीपात्रात सापडला असून वृत्त लिहिस्तोवर मृताची ओळख पटली नव्हती. तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध नागपूर व तिवसा पोलिस घेत आहेत.

अमरावती पोलिसांनी शोधमोहिम राबविली असता पुलापासून चार किलोमीटर अंतरावर भारवाडीत एकाचा मृतदेह आढळून आला. वर्धा जिल्ह्यातील परतोडा येथील नागरिकांच्या मदतीने बोटीच्या साहाय्याने नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.