मुख्य इमारतीचा प्रश्न 25 वर्षांनंतरही प्रलंबित, कृषी विभागाच्या जागेचा सांगली महापालिकेकडे हस्तांतराचा प्रस्ताव शासनदरबारी पडून
सांगली: सांगली महापालिकेच्या स्थापनेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली तरी देखील मुख्यालय इमारतीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मुख्यालयाच्या इमारतीसाठी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र अपुरी जागा असल्याने कृषी विभागाची जागा हस्तांतर करण्याचा निर्णय झाला होता. हा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून शासनदरबारी पडून आले. राज्यात भाजप-शिवसेना, महाविकास आघाडी आणि आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार आले तरी देखील इमारतीच्या प्रश्न अद्याप संपलेला नाही.
सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांची एकत्रित महापालिका झाली. महापालिका स्थापनेला २५ वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली.तरीदेखील मुख्यालयाचा कारभार हा सांगली पालिकेच्या जुन्या कार्यालयातूनच होत आहे. ही जागा आता अपुरी पडू लागली आहे. अनेक कार्यालये शाळा नंबर एकच्या इमारतीमध्ये तर अनेक कार्यालये ही मंगलधाम येथे स्थलांतर केली आहेत. मनपाच्या मुख्यालयाची सर्व कार्यालये एकाच छताखाली असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेला नवीन मुख्यालय इमारतीची गरज भासू लागली आहे.विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे. या परिसरात महापालिकेने नवीन मुख्यालय प्रस्तावित केले आहे. सांगली-मिरज रस्त्यालगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पश्चिमेला महापालिकेच्या मालकीची जागा आहे. ही जागा ५६ मीटर बाय १८८ मीटर आहे. ती आयताकृती आहे. या जागेलगतच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची जागा आहे. मनपा मुख्यालय आयताकृती ऐवजी चौरसाकृती झाल्यास इमारत देखणी व प्रशस्त होणार आहे. त्यामुळे कृषी विभागाची काही जागा घेऊन मुख्यालय इमारत शंभर मीटर बाय शंभर मीटर जागेत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मनपा व कृषी विभागात यांच्यात जागेची अदलाबदल करावी लागणार होती.तत्कालिन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कृषी विभागाची जागा महापालिकेच्या मिळण्यासंदर्भात हालचालींना गती आली. तत्कालिन कृषीमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी २५ मे २०२२रोजी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीपूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कृषीमंत्री भुसे यांच्याशी चर्चा केली. महापालिका मुख्यालय इमारतीस जागा देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. कृषी आयुक्तालयाकडून तशी शिफारस देखील झाली. या बदल्यात मनपाने कृषी विभागाला १२ मीटर रूंदीचा रस्ता करून देणे, जिल्हा नियोजन समितीमधून कृषी भवन बांधून देण्याचे ठरले.
त्यामुळे मुख्यालय इमारतीचा प्रश्न मार्गी लागला अशी आशा होती. मात्र कृषी मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर काही दिवसांनी राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारला सुरूंग लागला. राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. त्यामुळे मनपाला जागा मिळण्याची आशा फोल ठरली. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त देखील मिळाले नाही. आता राज्यात शिंदे-फडणवीस बरोबर अजितदादा पवार देखील सत्तेत सहभागी झाले आहेत. राज्यात तीन सत्ता झाल्या तरी इमारतीच्या जागेचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मनपाच्या विद्यमान सभागृहाची मुदत वीस दिवसात संपणार आहे. त्यामुळे तातडीने यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जागेचा प्रश्न सुटला तर तातडीने कामाला सुरूवात होईल.
मनपाची चार मजली इमारत अशी...
महापालिकेच्या नियोजित मुख्यालय इमारत दोन ग्राऊंड प्लोअर व चार मजली प्रस्तावित आहे. अंदाजे ३३ कोटी ३९ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्याचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. महापलिकेचे सर्व प्रशासकीय विभाग, पदाधिकार्यांची केबीन, सभागृह, व्हिवर्स गॅलरी, वेटिंग एरिया तसेच कव्हरर्ड पार्किंग, कोर्टयार्ड, कॅन्टिग हे सर्व एकाच छताखाली असणार आहे. इमारत देखणी व प्रशस्त असणार आहे. पण हे अस्तित्वात येण्यापूर्वी मुख्यालय जागेचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.