देशातील रिलायन्स ज्वेल्सवरील सांगलीतील पाचवा दरोडा!
सांगली : रिलायन्स ज्वेल्सवर रविवारी सशस्त्र दरोडा टाकून 14 कोटी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. याच पेढीवरील हा महाराष्ट्रातील पहिला दरोडा आहे. मात्र यापूर्वी याच पेढीच्या देशातील अन्य राज्यातील पेढीवर अशा प्रकारे 4 दरोडे टाकण्यात आले आहेत. सांगलीतील दरोडा पाचवा असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवारी दुपारी मार्केट यार्डजवळ असलेल्या रिलायन्स सराफी दुकानावर दरोडा टाकण्यात आला. यावेळी दरोदेखोरांनी पोलिस अधिकारी असल्याचे सांगत शोरूम मध्ये प्रवेश केला. दरवाजाजवळ असलेल्या महिला सुरक्षा रक्षकाला त्यांनी आत नेले. त्यानंतर पिस्तूलाचा धाक दाखवत कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचे हातपाय बांधले.दुपारच्या वेळी आलेला एक ग्राहक पळून जात असताना त्याच्यावर एका संशयिताने गोळीबार केला. त्याचवेळी अवघ्या 20 मिनिटात दुकानातील दागिने, हिरे, रोकड, मोबाईल लंपास केले. गोळीबाराच्या आवाजनांतर हातातील हिऱ्यांची पिशवी टाकून चोरटे पळून गेले.
रिलायन्सच्या देशात अन्य ठिकाणी असलेल्या 4 शोरूममध्ये यापूर्वी असेच दरोडे टाकण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यातील आणि सांगली जिल्ह्यातील रिलायन्स शोरूमवरील हा पहिलाच दरोडा आहे. त्यामुळे यापूर्वी देशात रिलायन्सवरील चार दरोडे आणि त्यातील संशयितांची माहिती पोलिस घेत आहेत. दरम्यान देशभरात या शोरूममध्ये असलेली तोकडी सुरक्षा व्यवस्था पाहूनच चोरट्यांनी डल्ला मारल्याची चर्चा आहे. या दुकानातील सर्व मुद्देमालाचा विमा असल्याने अशा चोऱ्या घडवून आणल्या जात आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.