आष्ट्यात सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्यासह दोघांवर गुन्हा
सांगली : वाळवा तालुक्यातील आष्टा येथे खरेदी केलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी लाच मगितल्याप्रकरणी तेथील तलाठी आणि तलाठी कार्यालयात काम करणारा खासगी व्यक्ती अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
तलाठी मारुती विलास सातपुते (वय 33 ), तबरेज मुजावर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदाराच्या वडिलांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी सातपुते यांच्यामार्फत मुजावर याने सुरुवातीला 25 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर 15 हजार, 10 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती 8 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली.
मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. विभागाने त्याची पडताळणी केल्यावर दोन्ही संशयितांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. आज त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र त्यातून ते निसटले. त्यानंतर तलाठी सातपुते, मुजावर यांच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी, पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस अंमलदार अजित पाटील, प्रितम चौगुले, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, चंद्रकांत जाधव, सिमा माने, उमेश जाधव चालक वंटमुरे यांनी ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.