राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात फाईलवर कोंबडा ठेवून महापालिकेत.
सांगली: राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात फाईलवर कोंबडा ठेवून महापालिकेत आले. ‘कोंबडा घ्या आणि फाईल मंजूर करा’, अशी घोषणा देत ते मुख्यालयात शिरले. मुख्य लेखाधिकारी महापालिकेत नव्हते. त्यामुळे त्यांनी लेखा विभागात आंदोलन केले. थोरात यांच्या या लक्षवेधी आंदोलनाची आयुक्त सुनील पवार यांनी दखल घेतली. नगरसेवक विकास निधीबाबत गुरूवारी निर्देश देण्यात येणार आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक १९ मे रोजी महासभेत मांडण्यात आले होते. प्रत्येक नगरसेवकांना ३० लाखांचा प्रभाग विकास निधी देण्याची घोषणा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली होती. त्यानुसार नगरसेवक थोरात यांनी प्रभाग क्रमांक २० मधील ६ शाळांना सीसीटीव्ही बसवणे, या कामाची १० लाख रुपये खर्चाची फाईल तयार केली. ही फाईल घेऊन ते सोमवारी मुख्य लेखाधिकारी केंबळे यांच्याकडे मंजुरीसाठी गेले. केंबळे यांनी फाईलवर ‘कोंबडा’ आहे का, असे विचारले (फाईलवर कोंबडा म्हणजे आयुक्तांची स्वाक्षरी). थोरात यांच्या फाईलवर आयुक्तांचा ‘कोंबडा’ नव्हता. थोरात यांनी मग शक्कल लढवली. मंगळवारी त्यांनी मटन/चिकन मार्केटमधून एक कोंबडा घेतला आणि थेट महापालिका गाठली.
महापालिकेत ते मुख्य लेखाधिकारी यांच्या दालनाकडे गेले. पण ते आज कोल्हापूर येथील कार्यालयात होते. त्यांच्याकडे कोल्हापूर आणि सांगली महापालिकेत मुख्य लेखाधिकारी असा कार्यभार आहे. थोरात हे मग लेखाविभागात गेले. ‘कोंबडा घ्या, फाईल मंजूर करा’, अशी घोषणा देत आंदोलन केले. महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्यापर्यंत या आंदोलनाची बातमी गेली. ते मुंबईत आहेत. बुधवारीही ते मुंबईत असणार आहेत. महासभेत झालेल्या निर्णयानुसार नगरसेवक प्रभाग विकास निधीतील कामे मंजूर करण्यासंदर्भात गुरूवारी महापालिकेत बैठक होईल. ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने ३० लाखांची कामे मंजूर केली जातील, असे आयुक्त पवार यांनी नगरसेवक थोरात यांना सांगितले. त्यानंतर थोरात यांनी आंदोलन मागे घेतले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.