रिलायन्स ज्वेल्सवरील दरोड्यात १४ कोटीचा ऐवज लुटल्याचे स्पष्ट
सांगली : मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीतील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर टाकलेल्या दरोड्यात तब्बल १४ कोटीचे सोने, हिरे आणि रोकड लांबवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरोड्यात वापरलेली एक टाटा सफारी मोटार मिरज-पंढरपूर रस्त्यावरील भोसे येथील यल्लमा देवी मंदिराच्या मागील बाजूस शेतात आज सापडली आहे. दरम्यान दरोडेखोरांच्या शोधात विविध भागात पथके रवाना झाली असून कसून तपास सुरू असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
मार्केट यार्डजवळील रिलायन्स ज्वेल्स या शोरूमवर रविवारी दुपारी तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी आतमध्ये घुसून पोलिस असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्यावर रिव्हॉल्वर रोखून हात- तोंड बांधले. दोन कर्मचाऱ्यांना सर्व सोने, हिरे, रोकड भरायला सांगितली. दरोडेखोरांनी शोरूममध्ये एका ग्राहकावर गोळीबार केला. त्यामुळे शोरूमची समोरील काच फुटली. गौरव सुरेश ढोमणे (वय ३०, रा. राममंदिर चौक) हा जखमी झाला आहे. दरोड्यानंतर रात्री उशिरापर्यंत लांबवल्या गेलेल्या दागिन्यांची व रकमेची माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते. दरोडेखोरांनी सोन्याचे व हिऱ्याचे दागिने आणि रोकड असा १४ कोटी ६९ हजार ३०० रूपयाचा ऐवज लांबवल्याचे स्पष्ट झाले आहे. शोरूमचे विक्री व्यवस्थापक महेश सुर्यवंशी यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरोड्यानंतर पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली होती. या दरम्यान दरोडखोर सापडल्याची अफवाही पसरली होती. आज सकाळी मात्र मिरज-पंढरपूर रस्त्यावरील भोसे येथे यल्लमा देवी मंदिराच्या मागे बेवारस स्थितीतील मोटार पोलिसांना आढळून आली. ती दरोड्यात वापर करून नंतर तेथेच सोडून दरोडेखोर पळाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके जिल्ह्याबाहेर रवाना झाली आहे. त्यांच्याकडून कसून तपास सुरू आहे...
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.