Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष; शेतकऱ्याला पावणेतेरा लाखांना गंडा

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष; शेतकऱ्याला पावणेतेरा लाखांना गंडा


मुंबई : रेल्वेत नोकरी लावून देतो, असे सांगायचे. गरजूंकडून पैसे उकळायचे. काम झाले की आपले दुकान बंद करायचे, असा फसवणुकीचा एक नवीन ट्रेण्ड निर्माण झाला असून, त्यात फसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रेल्वेच्या नावाने सुरू केलेल्या या फसवणुकीच्या तुफान मेलमध्ये लातूरमधील एका शेतकऱ्याचा समावेश झाला आहे. त्याला तब्बल पावणेतेरा लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

ही कहाणी आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील राजा गुट्टे यांची. ते शेती करतात. गेल्यावर्षी २० मे रोजी एका नातेवाइकाच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावण्यासंदर्भातील कामासाठी गुट्टे मुंबईत आले होते. वाकोलातील एका हॉटेलात त्यांची ओळख संतोष चोपडे याच्याशी झाली. गुट्टे यांच्या दोन मुलांना रेल्वेत लिपिकाची नोकरी लावून देतो असे आमिष चोपडेने दाखवले. गुट्टेही त्यास भुलले. नोकरी लावून देण्यासाठी मात्र दोन्ही मुलांचे १७ लाख रुपये लागतील, असे चोपडेने सांगितले. त्यानंतर गुट्टे गावी परतले. काही दिवसांनी चोपडेने गुट्टे यांना दूरध्वनी करून रेल्वेतील नोकरीविषयी विचारणा केली. अखेर त्याच्या आमिषाला बळी पडून त्यांनी पैसे पाठविण्यास सुरुवात केली. जवळील जमापुंजीसह नातेवाइकांडून पैसे घेत चोपडेपर्यंत पाठवले.

नियुक्तीपत्र दिले

* १५ सप्टेंबर रोजी चोपडेने गुट्टे यांना दूरध्वनी करून मुलाचे नियुक्ती पत्र तयार असून, घेऊन जाण्यास सांगितले. मात्र त्यापूर्वी सहा लाख रुपये देण्यास सांगितले.

* ठरल्याप्रमाणे २० सप्टेंबर रोजी सांताक्रूझ येथे गुट्टे आणि चोपडे यांची भेट झाली. त्यावेळी गुट्टे यांनी चोपडेला सहा लाख रुपये दिले. चोपडेने यावेळी गुट्टे यांच्या मुलाला मध्य पूर्व रेल्वेचे नियुक्तीपत्र दाखविले. त्यानंतर नोकरीवर कधी रुजू व्हायचे याबाबत चौकशी करताच चोपडेकडून टाळाटाळ सुरू झाली.

* काही दिवसांनी दुसऱ्या मुलाचेही नियुक्तीपत्र व्हॉट्सॲपवर पाठवले. त्यानंतर चोपडेसह त्याची पत्नीही 'नॉट रिचेबल' झाली. अखेर फसवणूक झाल्याची खात्री पटताच गुट्टे यांनी पोलिसांत धाव घेतली. चोपडे आणि त्याच्या पत्नीने दोन्ही मुलांना नोकरीचे आमिष दाखवून १२ लाख ७९ हजार रुपये लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार, वाकोला पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. या प्रकरणात आणखी शेकडो जणांची फसवणूक झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

रेल्वे ऑफिसात मुलाखत

गेल्यावर्षी १४ जून रोजी चोपडेच्या सांगण्यावरून गुट्टे मुलाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आले. तेथे चोपडेने त्यांना मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर मुलाखतीसाठी नेले. तिथे त्यावेळी आणखी १५ जण मुलाखतीसाठी उपस्थित होते. मुलाखत होताच गुट्टे मुलासह गावी परतले. मुलाखतीनंतर गुट्टेंनी उर्वरित पैसे चोपडेला पाठवण्यास सुरुवात केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.