"तर मंदिरातील पुजारी उघडे का?त्यांनीही सदरा घालावा ", छगन भुजबळ
तुळजापूर मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला होता. त्यानंतर भाविकांनी आक्षेप घेतल्यावर हा निर्णय चोवीस तासांमध्ये मागे घेण्यात आला. यावर छगन भुजबळ यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. तसंच मंदिरातले पुजारी उघडे का असतात? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांमध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांना वस्त्रसंहिता लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे हा मूर्खपणा आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.
मंदिरात जाताना शाळेला सुट्टी आहे. तो हाफ पँट घालूनच मंदिरात जाणार ना? त्या मुलाला हाफ पँट घातली म्हणून बाहेर काढण्यात आलं. हा तर मूर्खपणा आहे. तुम्ही अगदी वाट्टेल तसे कपडे घालून मंदिरात जाऊ नये हे मलाही मान्य आहे. पण अगदी सगळ्यांनीच नियम पाळायाचा असेल तर मंदिराच्या गाभाऱ्यात जे उघडेबंब असणारे पुजारी असतात त्यांनीही सदरा वगैरे घालावा. गळ्यात माळ घातल्यावर कळेल हा पुजारी आहे. पुजारीही अर्धनग्नच नसतात का? धोतर नेसावं, तुळशीमाळा घालाव्यात, सदरा घालावा त्यावरुन ओळखू येईल की हा पुजारी आहे. पण नाही ते उघडेच पाहिजेत.
जागावाटपाची चर्चा माध्यमांमध्ये कशाला?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून तसेच पुणे लोकसभा कोण लढवणार?, यावरून मविआत धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार या दोन्ही नेत्यांनी या जागेवर दावा सांगितला आहे. त्यावर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गोष्ट नाही. तिन्ही घटक पक्षांना विश्वासात घेऊन याबाबत आम्ही चर्चा करू. तसेच, कर्नाटकमध्ये भाजपचे जे पाणिपत झाले आहे, त्यावरून ते निवडणूक घेणार की नाही?, हे तर आधी स्पष्ट होऊ द्या
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.