Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेटत्या चितेमधून महिलेच्या शरीराचे काही अवयव काढून नेत जादूटोणयाचा प्रकार, मांत्रिक फरार

पेटत्या चितेमधून महिलेच्या शरीराचे काही अवयव काढून नेत जादूटोणयाचा प्रकार, मांत्रिक फरार


तासगाव : तासगाव शहरात स्मशानभूमीत अंत्यविधी झालेल्या एका महिलेच्या शरीराचे काही भाग काढून नेत जादूटोणा करण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून मांत्रिक फरार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. मात्र, महिलेच्या शरीराचे भाग काढण्यावेळी महिलेचे कुटुंबीय व मांत्रिक यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी मांत्रिकाने चाकू काढल्याची चर्चा आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आईचे सोमवारी आकस्मिक निधन झाले. तासगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अग्निसंस्कार झाले. अग्नी दिल्यानंतर काही मंडळी मयताचे पूर्ण शरीर जळेपर्यंत स्मशानभूमीतच थांबून होते. यावेळी तासगाव येथील एका व्यक्तीसोबत चार ते पाच मांत्रिक स्मशानभूमीत आले. ते आल्यानंतर त्यांनी मयत महिलेच्या पेटत्या चितेमधून त्या महिलेच्या शरीराचे काही अवयव शोधण्यास सुरुवात केली. यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तुम्ही कोण आहात व महिलेच्या शरीराचे काय अवयव तुम्ही शोधत आहात याबद्दल विचारणा केली.

यावेळी मांत्रिक व ते कुटुंबीय यांच्यात बाचाबाची झाली. ही बाचाबाची झाल्यानंतर त्यातील एका मांत्रिकाने चाकू काढून एका ठिकाणी गप्प बसण्यास त्यांना सांगितले. या घटनेनंतर हादरलेल्या त्या मंडळींनी काही लोकांना व तासगाव पोलिसांना याची कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तासगाव स्मशानभूमीत धाव घेतली. यावेळी त्यांनी एका तरुणाला पकडले, तर त्यातील मांत्रिकांनी पळ काढला. तासगाव पोलिसांत रात्री उशिरा ताब्यात घेतलेल्या तरुणाची चौकशी करण्याचे काम चालू होते. त्यांनी काय उद्देशाने हा प्रकार केला, याचा तपास पोलिस करत असून पळालेल्या मांत्रिकांचाही शोध तासगाव पोलिस घेत आहेत. मात्र, तासगाव पोलिसांत रात्री उशिरा याची नोंद नव्हती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.