पूर परिस्थितीत हानी टाळण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय राखा - प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सांगली :- यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास पुरामुळे कोणत्याही प्रकारची हानी होवू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय राखावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, पूर परिस्थितीत विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा तयार करावा. त्यानुसार कामे होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचे आदेश निर्गमित करावेत. पूर बाधित होणाऱ्या गावात जाऊन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घ्यावी. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास, बाधितांचे स्थलांतर, जनावरांचे स्थलांतर, पूर परिस्थितीत घ्यावयाची काळजी या बाबींसंदर्भात संबंधितांना माहिती देण्यात यावी. पाटबंधारे विभागाने पुरासंदर्भात नकाशे तयार केले असून या नकाशांची माहिती पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील लोकांना समजावून सांगावी. पुरामुळे बाधित लोकांचे स्थलांतर करावयाचे झाल्यास स्थलांतराच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. निवारा केंद्रांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सादर करावा. तसेच पशुसंवर्धन व कृषी विभागाने स्थलांतरित जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्धतेचे नियोजन करावे. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास या परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करता यावा यासाठी मॉकड्रील घेणे आवश्यक आहे. यंत्रणांनी जून मध्ये व जुलैमध्ये मॉकड्रील घ्यावे. मॉकड्रीलमध्ये सर्व यंत्रणांचा सहभाग राहील याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.श्री. डुडी म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात एक जून पासून नियंत्रण कक्ष कार्यरत करावा. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्याबरोबरच कक्ष 24 तास कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने धूर फवारणीसह आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवावा. अत्यावश्यक औषधे प्रत्येक आरोग्य केंद्रात उपलब्ध राहतील याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रात विद्युत वितरण कंपनीने खराब ट्रांसफॉर्मर दुरुस्त करून घ्यावेत. धोकादायक झाडांच्या फांद्या तोडाव्यात विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. पाणीपुरवठा विभागाने पूर परिस्थितीत जनतेला स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरामुळे बंद होणारे मार्ग याबरोबरच पर्यायी मार्गाची माहिती द्यावी. मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा. एसटी महामंडळाने पुरामुळे बंद होणाऱ्या मार्गाची माहिती त्यांच्या बस वाहक व चालकांना द्यावी.
पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पंचनामे करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने पथके गठीत करून ठेवावीत. मान्सूनमध्ये करण्यात येणारी कामे व अन्य सर्व बाबींचा दर पंधरा दिवसांनी उपविभागीय अधिकारी यांनी आढावा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.