प्रशांत कॉर्नरवरील तोडफोडीचा भंडाफोड करणारे अजय जेया यांना अटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सून आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची पत्नी वृषाली यांना व्हीआयपी ट्रीटमेंट न दिल्याने ठाण्यातील प्रख्यात मराठमोळय़ा 'प्रशांत कॉर्नर' या मिठाई दुकानावर पालिकेच्या अधिकाऱयांनी हातोडा घातल्याचा भंडाफोड करणारे सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने जेया यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली असतानाही मिंधे गटाने त्यांना जामीन मिळू नये म्हणून संध्याकाळपर्यंत वेळकाढूपणा केला. त्यामुळे जेया यांना आजची रात्र मध्यवर्ती कारागृहात घालवावी लागणार आहे. सत्तेचा दुरुपयोग करत पोलिसांच्या आडून सुडाचे राजकारण करत सर्वसामान्यांचा छळ करणाऱया मिंधे गटाविरोधात ठाण्यात संतापाची प्रचंड लाट पसरली आहे.
'प्रशांत कॉर्नर' या मराठी उद्योजकाच्या प्रख्यात दुकानावर शनिवारी अचानक महापालिकेचा हातोडा पडला. पालिकेने प्रशांत कॉर्नरची निवारा शेड आणि बांधकाम जमीनदोस्त केले; परंतु यामागचे कारण सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी उघडकीस आणले. मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून त्या संतापून तेथून निघून गेल्या आणि त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात राजकीय दबावातून प्रशांत कॉर्नरवर हातोडा पडल्याचा व्हिडीओ जेया यांनी व्हायरल केला. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांनी याची दखल घेत बातम्याही प्रसिद्ध केल्या.
जेया यांनी केलेला हा भंडापह्ड झोंबल्यामुळे मिंधे गटाने त्यांच्याविरोधात नौपाडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर जेयांविरोधात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र जेया यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीच त्यांचा दरवाजा ठोठावला. जेया यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर रात्रभर फिल्डिंग लावली. अखेर पहाटे 4.30 ला दार उघडल्यानंतर त्यांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.
आज दुपारी 2.30 वाजता जेया यांना कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी कस्टडी मागूनही न्यायालयाने नकार देत जेया यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली; परंतु त्यानंतर जेया यांना जामीन मिळू नये म्हणून मिंधे गटाने वकिलांमार्फत वेळकाढूपणा सुरू केला. आम्हाला सरकारी वकिलांचे म्हणणे तपासायचे आहे असे सांगत त्यांनी संध्याकाळपर्यंत वेळ काढला, त्यामुळे अखेर जेया यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करावी लागली. दरम्यान, जिया यांच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.