सांगलीत कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा;मनसेचा 8 जूनला मोर्चा
सांगली : जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या, घरफोडी, मारामारी, खुनी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. डिस्को बार संस्कृती फोफावली आहे. पुरावे देऊनही पोलीस कारवाई करत नाहीत. अवैध व्यावसायिकांची पाठराखण सुरू आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची सुरवात ८ जून रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यापासून करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली.
याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनाही निवेदन देण्यात आले. सावंत म्हणाले, पोलिसांच्याबाबत मनामध्ये कायम सन्मानाची भावना आहे. जिल्ह्यात खून, दरोडे, चोऱ्या घरफोडी, मारामारी, खुनी हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा फोल ठरली आहे. पुरावे देऊनही पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे फावले आहे.छोटे-छोटे व्यावसायिक, पान शॉप चालकांना वेळेचे बंधन घालण्यात येते. मात्र बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या डिस्को बारला पहाटेपर्यंत मुभा दिली जाते. नागरिकांच्या तक्रारीनुसार शेअर मार्केट कंपन्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. मात्र कारवाई झाली नाही. उलट त्या कंपन्यानांच संरक्षण देण्यात आले. याविरोधात रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांसमोर मनसेच्यावतीने आंदोलन करणार आहे. त्याची सुरवात ८ जून रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यापासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संदीप टेंगले, दयानंद मलपे, जमीर सनदी, अमित पाटील, कुमार सावंत, सिद्धार्थ सूर्यवंशी, बबलू यादव, अमर औरादे आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.