पुणे-बंगळूर महामार्गावर कुरिअरच्या गाडीवर दरोडा; 4 जण ताब्यात
पुणे: बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात चोरट्यांच्या लूटमारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दरम्यान, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील बोरगाव गावच्या परिसरात कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घेतल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यावेळी दरोडेखोरांनी ड्रायव्हरच्या तोंडावर स्प्रे मारून गाडीतून तब्बल ७ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि चांदी लुटले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांच्या पथकाने तत्काळ दरोडेखोरांचा पाठलाग केला. या थरारक घटनेत दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील एका कुरिअर कंपनीचे कर्मचारी मध्यरात्री २ वाजता पिकअप गाडीतून सोन्याच्या विटा आणि चांदी घेऊन पुण्याला निघाले होते. कुरिअरची गाडी सातारा तालुक्यातील बोरगाव हद्दीत आल्यानंतर चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी पीकअप गाडीचा थरारक पाठलाग केला आणि पिकअप गाडी थांबवली. चालकाने गाडी थांबवताच संबंधितांनी स्प्रे मारून व शस्त्राचा धाक दाखवून सुमारे 7 किलो वजनाच्या सोने आणि चांदीच्या विटा लुटले. यानंतर दरोडेखोर तेथून पसार झाले. या प्रकाराची माहिती बोरगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला मिळाल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली. या घटनेनंतर पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांकडून 17 किलो चांदी, 11 तोळे सोने आणि कार ताब्यात घेतली.
शनिवारी दागिन्यांच्या कुरिअरचे पार्सल घेऊन संतकुमार सिंग पुण्याच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्यासोबत गोलू दिनेश परमार हे प्रवास करत होते. दरम्यान, दरोडेखोरांनी लूटमार केल्यानंतर या घटनेची माहिती संतकुमार सिंग यांनी स्थानिकाच्या मोबाईलवरून कुरिअर कंपनीचे मॅनेजर राजकिशोर परमार यांना दिली. यानंतर परमार व हुपरी शाखेचे मॅनेजर तुषार नाईक हे काशीळ येथे आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच तपासकार्य युद्धपातळीवर राबविले आणि लुटारु टोळीचा पाठलाग करत संबंधितांना ताब्यात घेतले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.