1 जून पासून महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार
1 जून पासून महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार : राज्यातून पुरुषांचे १८ व महिलांचे १६ संघ येणार-माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन
कुपवाड : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार १ जूनपासून सुरू होत आहे. यासाठी राज्यातून पुरुषांचे १८ व महिलांचे १६ संघ येणार आहेत. चारशे खेळाडू सहभागी होत आहेत, अशी माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुपवाड रोड लक्ष्मी मंदिराजवळ नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर १ ते ४ जून या कालावधीत महापौर चषक कबड्डी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन १ जून रोजी सायंकाळी ७ वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार डॉ. विश्वजीत कदम, कबड्डी असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष रामभाऊ घोडके, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, भाजपचे नेते शेखर इनामदार, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राहूल पवार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बक्षिस समारंभ ४ जून रोजी रात्री ९ वाजता होणाार आहे. राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व माजी मंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते व आमदार, खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
पुरूष व महिला गटात पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ७५ हजार, ५१ हजार व ३० हजार रुपये बक्षिस आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूस ७ हजार, सर्वोत्कृष्ट चढाई ५ हजार, सर्वोत्कृष्ट पकड ५ हजार रुपयांचे बक्षिस आहे. ही स्पर्धा सात एकर जागेवरील ४ मैदानांमध्ये होत आहे. सात हजार क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभारली जात आहे, अशी माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली. यावेळी सभागृह नेत्या भारती दिगडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक अजित पाटील, सहायक आयुक्त नितीन शिंदे, क्रीडाअधिकारी महेश पाटील उपस्थित होते. दरम्यान, बेदाणा, हळद आणि भडंग ही 'यलो सिटी' सांगलीची ओळख आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि पंच यांना बेदाणा, हळद, भंडगचे पॅकेट भेट स्वरुपात दिले जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक व बेदाणा व्यापारी राजेंद्र कुंभार यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.