कवठेमहांकाळ येथे 13 हजारांची लाच घेताना स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला अटक
सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर हप्ते जमा करण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेताना कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाला रंगेहात पकडण्यात आले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी ही कारवाई केली. त्याच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित मुबारक मुल्ला (वय ४७, रा. शासकीय निवासस्थान रूम नंबर १ नविन तहसिलदार ऑफीसच्या समोर, नगरपंचायत चौक कवठेमहांकाळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्या निधी मधील तिसरा व चौथा हप्ता जमा करण्यासाठी मुल्ला यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत 'प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.तक्रारीनुसार दोन वेळा पडताळणी केली असता त्यामध्ये मुल्ला यांनी वीस हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १३ हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी कवठेमहांकाळ येथील म्हसोबा गेट येथे सापळा लावला होता. त्यावेळी मुल्ला यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून १३ हजार रूपये लाच स्विकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अजित पाटील, प्रितम चौगुले, ऋषीकेश बडणीकर, पोपट पाटील, सुदर्शन पाटील, रविद्र धुमाळ, चंद्रकांत जाधव, सिमा माने, उमेश जाधव, चालक वंटमुरे यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.