Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपला पराभूत करायचे ? तर हा 'फॉर्म्युला' वापरा, प्रशांत किशोर यांचा नवा 'मंत्र' काय ?

भाजपला पराभूत करायचे ? तर हा 'फॉर्म्युला' वापरा, प्रशांत किशोर यांचा नवा 'मंत्र' काय ?


बिहार : केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 224 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ही सेमी फायनल मानली जात आहे. त्यामुळेच भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे निवडणूक जरी कर्नाटकची असली तरी त्याचे वारे देशात वाहू लागले आहेत. देशभरात प्रमुख विरोधी पक्ष एकवटले असून भाजपला तगडी फाईट देण्याची तयारी करत आहेत. अशातच आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजपला हरवायचे असेल ‘फॉर्म्युला’ वापरा असा नवा मंत्र विरोधी पक्षांना दिला आहे. तसेच, राहुल गांधी यांच्या सदस्यत्वावरूनही मोठे भाष्य केले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे देशभरात निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. तर दुसरीकडे रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी जनसुराज यात्रा काढली आहे. बिहार येथे त्यांची जनसुराज यात्रा पोहोचली असून यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींना अपात्र ठरविणे दुर्दैवी आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय देखील चुकीचा आहे. भाजपचे आदरणीय नेते दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे एक वाक्य आहे. छोट्या मनाने कोणीही मोठा होत नाही. न्यायालयाने द्यायचा निर्णय दिला. पण, राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सरकारने पुरेसा वेळ द्यायला हवा होता असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसची स्थिती आता कमकुवत आहे. 1984 नंतर देशात निवडणुका जिंकून काँग्रेस सत्तेवर आलेली नाही. काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली नाही. त्यामुळे साहजिकच काँग्रेसचा जनाधार, त्याचा जनतेशी असलेला संपर्क कमी झाला आहे. काँग्रेस नेतेही याला सहमती देतील. पण, याचा अर्थ भाजप निवडणूक हरू शकत नाही असा नाही असे ते म्हणाले.

काँग्रेसने 2004 साली विखुरलेल्या विरोधकांच्या बळावर लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पराभव केला. लोकशाहीत तुम्ही या गोष्टी अगोदर सांगू शकत नाही. भाजप मजबूत स्थितीत आहे हे निश्चित. जो सत्तेत राहतो तो बलवान होतो. पण, सत्तेत बसलेली व्यक्ती कायमस्वरूपी सत्तेवर नसते. गांधी घराणेही सत्तेत होते. पुढे कोण सत्तेत येईल हे कुणीच सांगू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी यावेळी 2024 मध्ये भाजपला कसे हरवता येईल याचा फॉर्म्युला सांगितला. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 38 टक्के मते मिळाली याचा अर्थ 62 टक्के लोकांचा भाजपाला विरोध आहे. बहुमताचा विचार केला तर या 62 टक्के लोकांना एकत्र आणले तर भाजप सहज हरेल. मात्र, विखुरलेल्या या 62 टक्के लोकांना एकत्र आणण्याची किमया विरोधी पक्षांना आणि नेत्यांना करावी लागणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.