Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दक्षिण भारत जैन सभेतर्फे स्वस्तिश्री चारूकीर्ति भट्टारकांना भावपूर्ण आदरांजली

दक्षिण भारत जैन सभेतर्फे स्वस्तिश्री चारूकीर्ति भट्टारकांना भावपूर्ण आदरांजली


सांगली :
श्रवणबेळगोळ येथील जगद्गुरु, कर्मयोगी प.पू.स्वस्तिश्री भट्टारक चारूकीर्ति महास्वामीजी  यांचे दि. 23 मार्च 2023 रोजी पहाटे समाधी मरण झाले. दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली येथील शेठ रा.ध.दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये विनयांजली सभा संपन्न झाली. सुरूवातीला पूज्य स्वस्तिश्री चारकीर्ति महास्वामीजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून णमोकार महामंत्राचे जाप्य घालण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील म्हणाले, प.पू. स्वस्तिश्री चारूकीर्ती भट्टारक महास्वामीजी आणि सांगलीचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा सन 2000 चा चातुर्मास व 24 तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठाना नेमिनाथनगर सांगली येथे ऐतिहासिक स्वरूपात संपन्न झाला. यावेळी त्याचे सहा महिने वास्तव्य लाभले. याभागात विहार असताना ते आवर्जून सांगलीला भेट देत असत.

चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले, अत्यंत विनम्र, संयमी व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून घेले. चामुंडरायानी भ. गोमटेश्वरांची मूर्ती स्थापून विश्वविख्यात केली असली तरी या मूर्तीची किर्ती जगभरात पसरविण्यात महास्वामीजींचा मोलावा वाटा होता. धार्मिक महोत्सवाबरोबरच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्राचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. डिसेंबर 2019 साली महास्वमाजींच्या 50 व्या भट्टाभिषेक सोहळ्यावेळी दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने त्यांना चांदीचा कलश अर्पण करण्यात आला होता. 

बा.भु.पाटील ग्रंथ प्रकाशनचे चेअरमन डॉ. सी.एन.चौगुले म्हणाले, वयाच्या 20 व्या वर्षी भट्टारक पीठावर महास्वामीजी विराजमान झाले तेव्हापासून त्यांनी जैन प्राकृत भाषा, साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठे योगदान दिले. त्यांचा तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास, विविध भाषांवर प्रभुत्व विलक्षण छाप पाडणारी त्यांची मधुर भाषा, प्रवचन शैली, शांत, संयमी स्वभाव, नियोजनबद्ध कामकाज करण्याची शिस्त वाखाणण्याजोगी होती.

जैन बोर्डिंग चेअरमन प्रा.राहुल चौगुले म्हणाले, बोर्डिंगच्या विद्यार्थ्यानी श्रवणबेळगोळी येथे केलेल्या स्वच्छता मोहिमेचे खूप कौतुक महास्वामीजीनी केले होते. बोर्डिंगच्या कार्याचे ते कौतुक करीत त्यांनी बोर्डिंगच्या उपक्रमाना सक्रिय सहकार्य केले आहेत. महापुराच्या काळात चातुमार्सातील बंधन असताना सुद्धा विहार करून संकटात असलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत केली. मुख्यमंत्री सहाय्यता फंडासाठी त्यांनी 10 लाखाची मदत दिली होती. डॉ. अशोक नाईक यांनीही बाहुबली विद्यापीठाच्यावतीने विनयांजली अर्पण केली. 

यावेळी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, डॉ. अजित पाटील, प्रगति आणि जिनविजयचे संपादक डॉ. महावीर अक्कोळे, माजी संपादक प्राचार्य श्रीधर हेरवाडे, नीलम माणगावे, प्रा.डॉ. गोमटेश्वर पाटील, बा.भु.पाटील ग्रंथ प्रकाशनचे सेक्रेटरी एन.जे.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.