शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे थायरॉईड ओपीडीचे उद्घाटन
सांगली दि. 31 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 30 मार्च 2023 पासून "थायरॉईड ओपीडी" सुरू करण्यात आली आहे. मिशन थायरॉईड या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे सुद्धा थायरॉईड ओपीडी सुरू करण्यात असून थायरॉईड ओपीडी उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण विभागामध्ये करण्यात आले.
थायरॉईड ओपीडी उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. रजनी जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. अनिता बसवराज, नोडल अधिकारी डॉ. अभय भोसले, डॉ. मगदूम, डॉ. पाटणकर, डॉ. माळी, डॉ. बारावकर, अधिसेविका श्रीमती शहाणे व श्रीमती दीप आदी उपस्थित होते.
यावेळी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. अनिता बसवराज यांनी थायरॉईड आजारांविषयी मार्गदर्शन केले. तसेच थायरॉईड मिशनचे नोडल ऑफिसर डॉ. अभय भोसले यांनी थायरॉईड ओपीडी बद्दल उपस्थितांना अवगत केले. थायरॉईड ओपीडीचा समाजातील सर्व घटकांनी उपभोग घेऊन थायरॉईड आजारांपासून स्वतःची मुक्तता करण्याचे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात आले.
सध्या थायरॉईड रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत असून अनेक रुग्णांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे असे निदर्शनास येते. याकरिता मिशन थायरॉईड अंतर्गत स्वतंत्र थायरॉईड ओपीडीमध्ये एकाच छताखाली त्यांना आवश्यक असलेल्या सर्व तज्ज्ञांची सेवा, तपासण्या व उपचार उपलब्ध करण्याच्या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मेडिसिन, सर्जरी, कान नाक घसा विभाग हे एकाच छताखाली कार्यरत असतील. या रुग्णांकरिता आठवड्याच्या दर गुरुवारी दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये ओपीडी नंबर 8 मध्ये रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. थायरॉईड ओपीडी ही संकल्पना संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार असून या संकल्पनेमुळे राज्यभर रुग्णांमध्ये थायरॉईडच्या आजारासंबंधी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.