Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंदिराची घंटा - केरळमधील एक कथा

मंदिराची घंटा - केरळमधील एक कथा


केरळमध्ये एका गावात एक मंदिर उभारले गेले होते. नवीन मंदिरात एका पुजाऱ्यांची नेमणूक करण्याचे तेथील स्थानिक मंदिर संचालक कमिटीने ठरवले व इच्छुकांना निवड प्रक्रियेसाठी पाचारण केले गेले. बरेचजण त्या मंदिरात पुजारी म्हणून काम करण्यासाठी इच्छुक होते. ठरलेल्या दिवशी सर्वजण आले. त्यामध्ये एक पद्मनाभ नावाचा तरुणही होता. शिक्षण जास्त नव्हते नोकरी मिळत नव्हती. मंदिरात पुजारी म्हणून तरी काम मिळेल या आशेने तो तेथे आला होता. त्यादिवशी बरेच इतर पुजारीसुद्धा तिथे जमा झाले होते. सर्वांनाच धर्माचे उत्तम ज्ञान होते. संचालक मंडळाला त्यातून एकाची निवड करणे अवघड वाटत होते. अनेकजण पुजारी म्हणून उत्तम होते. शेवटी संचालक मंडळातील एकाने असे सुचवले की ज्याला सर्वात चांगली घंटा वाजवता येईल त्यालाच मंदिराचा पुजारी म्हणून नियुक्त केले जाईल. त्यानुसार सर्व पुजाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली. पद्मनाभ नीट घंटा वाजवता न आल्याने त्याची निवड झाली नाही.

तो मनात थोडा निराश झाला. त्याचा तिथे अपेक्षा भंग झाला होता. आता काय करावे? तो मंदिराबाहेर बसून विचार करू लागला. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. मंदिरासमोर खूप मोकळी जागा होती. त्याने संचालक मंडळाची परवानगी घेऊन समोर एक चहाची टपरी सुरू केली. मंदिरात भेट द्यायला येणारे भक्तगण ग्रामस्थ तिथे जाऊन चहा प्यायचे. हळूहळू ते मंदिर प्रसिध्द होऊ लागले तशी मंदिरास भेट देणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली. खूप दूरगावातून लोक यायला लागले. तसा पद्मनाभचा चहाचा व्यवसायही वाढला. तिथे जवळपास अल्पोपहाराची इतर सोय नव्हती. तेव्हा लोकांनी त्याला सुचवले की, तुझा चहा तर उत्तम आहे.

पण तुझ्या टपरीवर जर तू अल्पोपहाराचे पदार्थ ठेवलेस तर बरे होईल. पद्मनाभला ते पटले. कारण आसपास त्या ठिकाणी अल्पोपहाराची सोय कुठेच नव्हती. पद्मनाभने लवकरच अल्पोपहाराचे उपवासाचे पदार्थ विकायला सुरुवात केली. आता त्यांचा व्यवसाय चांगला चालू लागला. त्याच्या टपरीजवळ एक शेड बांधून टेबल खुर्च्या लावून सर्वांसाठी बसण्याचीही सोय केली. पुढे भक्तांची, पर्यटकांची संख्या अजून वाढत गेली. पुढे भक्तांच्या आग्रहावरून त्याने जेवणाची थाळी विकायला सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्याची आर्थिक स्थिती सुधरू लागली. त्याला गावातही मान मिळू लागला.

आता त्याचे रेस्टारंट झाले, पद्मनाभ एक व्यावसायिक बनला होता. एका भक्ताने त्याला सांगितले की इथे बाहेरून येणाऱ्या भक्तांची राहण्याची सोय नाही. पद्मनाभने त्याच्या रेस्टारंटचे एका लॉजमध्ये रूपांतर करून भक्त व पर्यटकांच्या राहण्याची सोय केली. त्याचा धंदा जोरात चालू आहे, तो सर्वांना उत्तम सेवा पुरवतो. मंदिराच्या वार्षिक जत्रेस दरवर्षी देणगी देतो. जसजशी मंदिरात येणाऱ्या भक्तांची, पर्यटकांची संख्या वाढते तसतसा त्याचा व्यवसाय वृध्दींगत होतोय. एकेकाळचा बेरोजगार पद्मनाभ आज तिथला सर्वात यशस्वी श्रीमंत हॉटेल व्यावसायिक झालाय. पद्मनाभने गावातील इतर बेरोजगार तरुणांना त्याच्याच हॉटेलमध्ये काम दिले आहे. त्यामुळे त्याची समाजात प्रतिष्ठा देखील वाढली. गावातील तालुक्यातील अनेक नामवंत व्यक्तींची त्याच्या घरी ऊठबस चालू असते. त्याला खूप मान मिळतोय.

एका व्यक्तीने त्याला त्यांच्या यशाचे गुपित विचारले. पद्मनाभ म्हणाला, "माझ्या यशाचे गुपित मंदिराच्या घंटेत आहे. मला घंटा वाजवता येत नाही म्हणून मी आज श्रीमंत झालोय. जर मला ती घंटा वाजवता आली असती तर मी मंदिरात पुजारी म्हणूनच राहिलो असतो. मित्रांनो, कधीकधी संधी थोडक्यात हुकतात. म्हणून डोक्याला हात लावून बसू नये. डोळे उघडा, आजूबाजूला पहा. बरेच पर्याय, संधी उपलब्ध असतात. पण नोकरीच्या नादात त्या दिसत नाहीत. वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते. तेव्हा आपल्याकडे पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नसतो. पद्मनाभने संधी निर्माण केली व व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच्याजवळ काही नव्हते. तरी त्याने छोटासा का होईना, व्यवसाय केला. पुढे त्याला अनुभव येत गेला. संधी आपोआप दिसू लागल्या. प्रत्येक वेळी त्याने संधीचा फायदा उठवला आणि आज तो त्याच्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनात यशस्वी श्रीमंत आणि सुखी आहे. म्हणून संधी हुकल्यावर निराश होऊ नका नैराश्येवर पाय ठेवून पुढे चालत रहा. संधी मिळत जाईल तिचा फायदा घेत जा.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.