Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संपूर्ण कृषी अधिकारी कार्यालयच लाचलुचपतच्या जाळ्यात!

संपूर्ण कृषी अधिकारी कार्यालयच लाचलुचपतच्या जाळ्यात!


छत्रपती संभाजीनगर :  येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली एक कारवाई चर्चेचा विषय बनला आहे. लाच घेणाऱ्या संपूर्ण कृषी अधिकारी कार्यालयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर (वय 49 वर्षे), मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे (57 वर्षे), बाळासाहेब संपतराव निकम (57 वर्षे) आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे (वय 24 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ठिबक सिंचन साहित्याच्या डीलरचे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी आणि अनुदानप्राप्त 35 फाईलसाठी 24 हजार 500 रुपयांची लाच घेणाऱ्या खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. तक्रारदार डीलरने कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजने अंतर्गत विभागातील 35 शेतकऱ्यांना कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविले होते. याबाबतच्या संचिका कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे यांच्यामार्फत सादर न करता परस्पर तपासून घेतल्या होत्या. त्यामुळे स्टॉक रजिस्टर चेक करण्यासाठी व तक्रारदार यांचे विरुद्ध आलेला माहिती अधिकार अर्ज फाईल करण्यासाठी तसेच अनुदान प्राप्त 35 फाईलसाठी प्रत्येकी सातशे रुपये फाईल याप्रमाणे 24 हजार 500 रुपयेची लाच अधिकाऱ्यांनी मागितली होती.

मात्र तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार पथकाने सापळा लावला असता, अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार कंत्राटदार सागर याने लाचेपोटी 24 हजार 500 रुपये स्वीकारले. तर बाळासाहेब निकम याने मुळ लाच मागणीशिवाय अधिकचे एक हजार रुपये स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी मागणी करुन ते स्विकारले. तसेच डीलरच्या तक्रारीवरुन एसीबीने शहानिशा केली असता इतर अधिकाऱ्यांनी देखील लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चौघाही आरोपींना एसीबीने बेड्या ठोकत, खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.