सांगलीतील मधुमेह सशोधनास आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
सांगली : गेल्या दोन वर्षांपासून मधुमेही रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या सांगलीतील केंद्रात ५० रुग्णांवर केलेल्या मधुमेहमुक्ती प्रयोगाला व संशोधनाला इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेडिकल सायन्स ॲण्ड करंट रिसर्च या संस्थेने मान्यता दिली आहे. प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या जर्नलमध्ये या संशोधनाला स्थान देण्यात आले आहे.
सांगलीतील मधुमेहमुक्ती केंद्र हे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन वर्षे सुरू आहे. सांगलीच्या केंद्रामधून मागील वर्षी एक संशोधन करण्यात आले. ५० लोकांच्या मधुमेहमुक्तीची वाटचाल करताना त्यांचे प्रत्येक महिन्याचे वैद्यकीय अहवाल नोंदविले गेले. त्यावर संशोधन अहवाल तयार करण्यात आला. इंटरनॅशनल जर्नलकडे तो पाठविण्यात आला. त्याची तपासणी करण्यासाठी एक पथक पाठविण्यात आले. त्यांनी रुग्णांचा इतिहास व वैद्यकीय अहवालांची पाहणी केली. तपासणीचा अहवाल त्यांनी संबंधित संस्थेला पाठविल्यानंतर तो स्वीकारण्यात आला. त्याची मार्च-एप्रिलच्या संशोधन लेखात प्रसिद्धी करण्यात आली.सांगलीचे डॉ. सतीश परांजपे, मेघना भिडे, चिंतामणी बोडस, भावना शहा, श्रीरंग केळकर आणि केंद्रास जागा देणाऱ्या डॉ. शार्दुली तेरवाडकर यांच्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगण्यात आले. भारती विद्यापीठातर्फे डॉ. राजेंद्र भागवत यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने संशोधन पाहणी केली.
पॅटर्न काय आहे?
नित्य ठरावीक प्रकारचा आहार, हलके व्यायाम आणि जीवनशैलीत काही बदल करून मधुमेहमुक्तीचा प्रयोग करण्यात आला. हा पॅटर्न यशस्वी ठरला आहे.
टाईप टू मधुमेहींवर प्रयोग
संशोधन केलेले सर्व रुग्ण टाईप टू मधुमेह असलेले आहेत. प्रत्येक महिन्याला त्यांची रक्त चाचणी केली. त्याचा आलेख खाली जात हे रुग्ण मधुमेहमुक्त झाले.
टाईप टू मधुमेह काय आहे?
मधुमेहाचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात (टाइप-१) शरीरात इन्सुलिन नाममात्र तयार होते किंवा पूर्णपणे नष्ट झालेले असते. दुसऱ्या प्रकारात (टाइप-२) स्थूलतेमुळे शरीरातील इन्सुलिनच्या क्षमतेला अवरोध निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढत राहते. भारतात मधुमेहाचे रुग्ण बहुतांशी या दुसऱ्या प्रकारचे आहेत.
या डॉक्टरांचा संशोधन लेखात उल्लेख
संशोधन लेखात सांगलीतील डॉ. सतीश परांजपे, डॉ. रत्ना आष्टेकर, डॉ. गिरीश धुमाळे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. श्रद्धा बडगुजर यांचा उल्लेख केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.