30 एप्रिल रोजी होणार सांगली जिल्ह्यातील बाजार समित्यांचे मतदान
संपूर्ण जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगलीसह जिह्यातील सात बाजार समित्यांचे सोमवारपासून धूमशान सुरू होत आहे. बाजार समित्यांसाठी 30 एप्रिलला मतदान होणार असून, 27 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 5 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. जिह्यातील सातपैकी सांगली बाजार समिती राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मानली जाते. तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र असल्याने सांगली बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठsची होणार आहे. तब्बल अडीच वर्षे निवडणूक लांबल्याने बाजार समितीमध्ये संचालक होण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे.
सांगली जिह्यातील सात बाजार समित्यांच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत अडीच वर्षांपूर्वी संपली आहे. सध्या प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. मागील आठवडय़ात सहकार प्राधिकरणने बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिह्यातील सांगली, तासगाव, पलूस, विटा, ईश्वरपूर, शिराळा आणि आटपाडी या सात बाजार समित्यांमध्ये पंचवार्षिक निवडणूक होत आहे. जिह्यातील सात बाजार समित्यांसाठी 24 हजार 528 मतदार आहेत. त्यामध्ये सांगली बाजार समितीचे तीन तालुक्यांत 8 हजार 675 सर्वाधिक मतदार आहेत. शिराळा 2 हजार 886 मतदार, आटपाडी 1 हजार 992, विटा 3 हजार 159, पलूस 1 हजार 158, इस्लामपूर 4 हजार 739, तर तासगाव बाजार समितीच्या 1 हजार 949 मतदारांचा समावेश आहे.
दरम्यान, सांगली बाजार समिती राजकीयदृष्टय़ा संवेदनशील समजली जाते. मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र असून, बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जातात. बाजार समितीमध्ये संचालक म्हणून निवडून जाण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. मात्र, राजकीय नेत्यांकडून पॅनलबाबतची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, त्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू झाली आहे.
बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम
- - अर्ज दाखल करणे ः 27 मार्च ते 3 एप्रिल
- - अर्जाची छाननी ः 5 एप्रिल
- - वैध उमेदवारांची नावे प्रसिध्द करणे ः 6 एप्रिल
- - अर्ज माघार घेणे ः 6 ते 20 एप्रिल
- - उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे ः 21 एप्रिल
- - मतदान ः 30 एप्रिल
- - मतदान संपल्यानंतर मतमोजणी ः 30 एप्रिल
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.