राम मंदिराचे पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी राहुल गांधींना दिल्या शुभेच्छा..
नवी दिल्ली : राहुल गांधींच्या नेतृत्त्वात निघालेली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' दिल्लीवरून उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. या 'भारत जोडो यात्रे'ला राम मंदिराचे पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबत राहुल गांधी यांना त्यांनी एक पत्र लिहून आशीर्वादही दिले आहेत. विशेष बाब म्हणजे हे पत्र महंत सत्येंद्र दास यांनी त्यांच्या लेटरहेडवर लिहिले आहे. त्यामुळे याला राजकीय रंग दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पत्रात,’तुम्ही काढलेली भारत जोडो यात्रा देशाच्या हितासाठीच आहे. भारत जोडो यात्रा यशस्वी व्हावी तसंच तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळावं असे आशीर्वाद महंत सत्येंद्र दास यांनी दिले आहेत. एवढंच नाही तर तुमच्या दीर्घायुषी व्हा’ असाही आशीर्वाद त्यांनी राहुल गांधी यांना पत्रातून दिला आहे. सत्येंद्र दास यांनी राहुल गांधींना उद्देशून लिहिलेले पत्र व्हायरल होते आहे. ‘भारत जोडो यात्रे’ला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वजन सुखाय सर्वजन सुखाय असं म्हणत सत्येंद्र दास यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच राहुल गांधी तुम्ही काढलेली ही भारत जोडो यात्रा मंगलमय व्हावी, यशस्वी व्हावी हा आशीर्वादही तुम्हाला देतो आहे असेही महंत सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे.
प्रभू रामचंद्रांना काल्पनिक मानणाऱ्या काँग्रेस पक्षाला अय़ोध्येतील राम मंदिराच्या मुख्य पूजाऱ्यांनी पत्र लिहिले आहे ही बाब चर्चिली जाते आहे. सत्येंद्र दास यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही सगळेच रामलल्लाकडे प्रार्थना करतो आहोत. या पत्रात कुठलंही राजकारण नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. आता सध्या तरी या पत्राकडे कुतुहल म्हणूनच पाहिलं जातं आहे. मात्र राहुल गांधी यांना आशीर्वाद देणारं पत्र महंत सत्येंद्र दास यांनी लिहिलं असल्याने त्याला राजकीय रंगही दिला जाण्याची शक्यता आहे.
सत्येंद्र दास यांनी आपल्या पत्रात हा विश्वास व्यक्त केला आहे की राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नक्की यशस्वी होईल. आपला देश एकवटला तर त्याची प्रगती होईल यात काही शंकाच नाही. जर आपण एक झालो तर आपल्याला दहशतवाद आणि कट्टरता याच्याशी लढता येईल. मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतो आहे याचा कुठलाही राजकीय अर्थ कुणीही काढू नये आणि माझ्या आशीर्वादाला राजकीय रंग देऊ नये असेही महंत सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महंत जन्मजेय यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. महंत जन्मेजय हे जानकी घाटाचे पुजारी आहेत. भारतमातेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आवडणारच असंही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी हे यात्रेतून देश जोडू पाहात आहेत आणि त्यांचा हा प्रय़त्न नक्कीच स्वागतार्ह आहे. आम्ही संत-महंत जे आशीर्वाद राहुल गांधींना देत आहोत त्याकडे कुणीही राजकीय चष्म्यातून पाहू नये असे महंत जन्मजेय यांनीही स्पष्ट केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.