राहुल गांधी यांची ठाम भूमिका..
विरोधी पक्ष मजबुतीने उभे राहिले तर भाजपला 2024 जिंकणे कठीण
जनतेसमोर पर्यायी दृष्टिकोन घेऊन सर्व विरोधी पक्ष ठामपणे उभे राहिले तर 2024 ची लोकसभा निवडणूक जिंकणे भाजपला अत्यंत कठीण जाईल. देशामध्ये सर्वत्र हाच अंडरकरंट आहे, अशी ठाम भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली आहे. राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा मुक्काम दिल्लीत आहे. पुढील आठवडय़ात ही यात्रा कश्मीरच्या दिशेने मार्गस्थ होईल. बिहार, उत्तर प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. 'भारत जोडो' यात्रेत यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बसपा अध्यक्षा मायावती सहभागी होणार का?
असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या एकतेवर भाष्य केले. 'मला देशातील जनतेकडून स्पष्ट अंडरकरंट मिळत आहेत. मी पाहतो आहे की, विरोधी पक्ष मजबुतीने उभा राहिला. जनतेला पर्यायी दृष्टिकोन दिला तर आगामी 2024 ची सार्वत्रिक निवडणूक जिंकणे भाजपसाठी खूपच कठीण आहे,' असे राहुल गांधी यांनी सांगितले. विरोधी पक्षांमध्ये योग्य समन्वय हवा. एकमेकांविषयी आदरभाव पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या देशाची संपूर्ण चौकटच एका आयडॉलॉजीच्या हातात गेली आहे. राजकीय जागाही त्यांनी व्यापली आहे. अशा वेळी त्यांचा (भाजप) पराभव करायचा असल्यास पर्यायी दृष्टिकोन दिला पाहिजे, असे ते म्हणाले. भाजप सरकारच्या अपयशाचे अनेक मुद्दे आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, मजुरांचे प्रश्न आहेत. जनतेला सत्य परिस्थिती सांगण्यासाठी माझी 'भारत जोडो' यात्रा आहे. सर्वांसाठी ही यात्रा आहे. ज्याला देश जोडायचा आहे तो कोणताही पक्ष यात सामील होऊ शकतो. असे त्यांनी सांगितले.
संघ, भाजपला मी गुरू मानतो
भाजपने माझी बदनामी करण्यासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च केले. भाजपने माझ्यावर आक्रमकपणे टीका करावी. कारण त्यांच्या टीकेमुळे काँग्रेस पक्षाला आपली विचारधारा समजण्यास मदत होईल. माझ्यावर जेवढी टीका भाजप करेल तेवढा काँग्रेसला फायदा होईल. एकाप्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला मी गुरू मानतो. त्यांच्यामुळे मला आयुष्यात काय करू नये याची शिकवण मिळते, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.
'भारत जोडो' यात्रेत सुरक्षेवरून सरकारच्या भूमिकेवर राहुल गांधी यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सरकारला वाटते की मी बुलेटप्रूफ गाडीतून 'भारत जोडो' यात्रा करावी, परंतु ते मला मंजूर नाही. बुलेटप्रूफ गाडीत बसून कशी यात्रा करणार, असा सवाल त्यांनी केला. भाजपचे नेते सुरक्षा प्रोटोकॉल तोडतात तेव्हा कोणी बोलत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
चीन-पाकिस्तान एकत्र येणे धोकादायक
केंद्रातील भाजप सरकारने परराष्ट्र धोरणात अनेक चुका केल्या. चुकीच्या पद्धतीने हे धोरण राबविले. चीन आणि पाकिस्तान एकत्र आले. हे आपल्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. सरकारने आतातरी आपल्या चुका दुरूस्त कराव्यात. देशहितासाठी सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत आहेत असे राहुल गांधी यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.