"घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार हेच भारतातील वास्तव"; इन्फोसिसचे नारायण मूर्ती..
देशभरातील राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवर तापलेले आहे. विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. यातच सामाजिक विषयांवर वेळोवेळी स्पष्ट भूमिका मांडणारे इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारतातील सध्याच्या परिस्थितीवर परखड भाष्य केले आहे. भारत आणि सिंगापूरमधील परिस्थितीची तुलना करताना विद्यार्थ्यांना पुढे येऊन नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन नारायण मूर्ती यांनी केले.
आंध्र प्रदेशमधील विझियानगरम जिल्ह्यातील राजम भागात असणाऱ्या जीएमआर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात नारायण मूर्ती बोलत होते. आपण सगळ्यांनीच कोणत्याही कमतरतेकडे बदलाची एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. इतर कुणीतरी नेतृत्व स्वीकरण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही सर्वांनी स्वतः नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे नारायण मूर्ती उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.
घाणेरडे रस्ते, भ्रष्टाचार हेच भारतातील वास्तव
नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना भारत आणि सिंगापूरमधील वास्तवातला फरत सांगितला. भारतातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते, प्रदूषण आणि वीजेची कमतरता आहे. तर दुसरीकडे सिंगापूरमधील वास्तव म्हणजे स्वच्छ रस्ते, प्रदूषण नाही आणि भरपूर वीज आहे. अशा परिस्थितीत ते नवीन वास्तव निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे, असे मूर्ती यांनी नमूद केले. तरुणांनी समाजामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने आपली मानसिकता घडवायला हवी. आपल्या स्वत:च्या हिताच्याही आधी लोकांचे, समाजाचे आणि देशाचे हित ठेवायला हवे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, एन. नारायण मूर्ती यांनी यावेळी बोलताना आपली एक चूक जाहीरपणे मान्य केली. संस्थापकांच्या मुलांनी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ नये, अशी भूमिका मांडणे ही माझी चूक होती. संस्थापकांच्या पुढच्या पिढीला इन्फोसिसमधून बाहेर ठेवणे ही चूक होती, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी नारायण मूर्ती यांनी यूपीए सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारतातील आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या होत्या. त्यावेळेस असलेल्या सरकारने आवश्यक ते निर्णय वेळेवर घेतले नाहीत. अशा परिस्थितीत अडचणीत वाढ झाली. आजचे तरुणांचे विचार भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनबरोबर स्पर्धा करू शकतात, असे ते म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.