Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनिल देशमुख यांना नववर्षाचं गिफ्ट मिळणार..

अनिल देशमुख यांना नववर्षाचं गिफ्ट मिळणार..


आजची सुनावणी टळल्यास तुरुंगाबाहेर येणार?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाला सीबीआयने दिलेल्या आव्हानावर आज (27 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात  सुनावणीची शक्यता कमीच आहे. सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकरता अद्याप कोणतीही हालचाल करण्यात आलेली नाही. याबाबत अनिल देशमुख यांच्या वकिलांनी एबीपी माझाला माहिती दिली. त्यामुळे आज दिवसभरात सुनावणी न झाल्यास अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख नवीन वर्षाचं स्वागत कुटुंबियांसोबत करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यापासून काय घडलं?

मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सीबीआयने देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देशमुखांच्या जामीनाला स्थगिती दिली होती. नाताळच्या सुट्टीत सर्वोच्च न्यायालयाच कामकाज बंद राहिली या कारणामुळे सीबीआयने पुन्हा हायकोर्टात धाव घेत या स्थगितीला मुदतवाढ मिळण्याची मागणी केली. ती सुद्धा न्यायालयाने त्यांना दिली. जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपत आहे. 27 डिसेंबरची स्थगितीची मुदत शेवटची असेल असं हायकोर्टाने म्हटलं होतं. या दरम्यानच्या काळात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रयत्न करणं अपेक्षित होतं. पण तसं झालेलं नाही. त्यामुळे आज दिवसभरात सीबीआयने दिलेल्या आव्हानावर सुनावणी झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन तात्काळ लागू होऊ शकतो.

उद्या अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार?

आज या जामीनाच्या वाढीव स्थगितीची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आज सुनावणी झाली नाही तर उद्या अनिल देशमुख मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येतील. त्यानुसार त्यांचे वकील कायदेशीर प्रक्रिया उद्या सकाळीच पूर्ण करतील. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टातून रिलीज ऑर्डर घेतली जाईल. मग ती आर्थर रोड तुरुगांत जमा केली जाईल. आज दिवसभरात सुनावणी झाली नाही तर उद्या दुपारपर्यंत अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणं अपेक्षइत आहे.

अनिल देशमुख 1 नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात

1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. मागील महिन्यात अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयच्या प्रकरणात देशमुखांना जामीन मिळणं बाकी होतं. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने सीबीआयच्या प्रकरणातही अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर केला. परंतु त्याच दिवशी जामीनाला दहा दिवसांची स्थगिती देखील दिली.

प्रकरण नेमकं काय?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.