बॉर्डरवरील बंदोबस्ताचा खर्च कोणाचा?
सांगली : गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात येऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बॉर्डरवर कायमस्वरूपी चेकपोस्ट उभारले आहे. तेथे बंदोबस्त करणाऱ्यांचा खर्च कोण करते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या बंदोबस्तासाठी शासनाकडून कोणताही भत्ता मिळत नसल्याचे अधिकारी, कर्मचारी खासगीत बोलत आहेत. गोवा बॉर्डरवरील या चेकपोस्टवर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी नेमण्यात येतात. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दीड महिन्यातून एकदा तरी 8 दिवस तरी त्यांना ड्युटी करावी लागते. त्यामुळे ठराविक जिल्ह्यातील लोकांनाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.
बॉर्डरवरील या ड्यूटीसाठी शासनाकडून कोणताही भत्ता मिळत नाही. शिवाय जिथे चेकपोस्ट आहे तिथे जवळपास शासकीय विश्रामगृह नाही तसेच राहण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे चेकपोस्टवरील ड्युटी संपल्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वखर्चाने एखाद्या हॉटेलमध्ये रहावे लागत आहे. गोवा चेकपोस्टवर महिला अधिकारी, कर्मचारी यांनाही ड्युटी दिली जाते. पण जवळपास कुठेच स्वच्छतागृह नसल्याने त्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे गोवा बॉर्डरवर ड्युटी करणाऱ्या सर्वांनाच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिवाय ज्या त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लोकांना मात्र बॉर्डरवरची ड्यूटी दिली जात नाही अशीही तक्रार केली जात आहे. प्रतिकूल परिस्थितीत ड्युटी करणाऱ्यांची नवीन आयुक्तांनी दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.