सांगलीकर विचारत आहेत; रोज रात्री का उडतात फटाके ?
सांगली शहरात रोज रात्री फटाके का उडतात असा प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे. रात्री दहानंतर शहरातील रस्त्यावर फटाक्यांचे मोठे आवाज ऐकू येतात. याची शहानिशा केल्यानंतर तो आवाज फटाक्यांचा नसून काही गाड्यांच्या सायलेन्सरमधून येत असल्याचे स्पष्ट झाले.
मॉडीफाईड सायलेन्सर गाड्यांना लावू नयेत असे शासनाचे आदेश आहेत. अशा सायलेन्सर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश शासनाने वेळोवेळी दिले आहेत. तरीही सांगलीत गाड्यांच्या सायलेन्सरमधून मोठे आवाज येतच आहेत. काही वर्षांपूर्वी सांगलीत असे मॉडीफाईड सायलेन्सर असलेल्या वाहनांसह त्यांच्या धारकांवर कारवाई करण्यात आली होती. पण त्यानंतर कारवाई का थंडावली हा संशोधनाचा विषय आहे.
शहरातील हॉस्पिटल्स, प्रमुख कार्यालये असलेल्या रस्त्यांवरून मोठा आवाज करत ही वाहने सुसाट वेगाने धावत असतात. रात्री दहानंतर असे प्रकार प्रकर्षाने जाणवतात. रात्री 9 नंतर कोणीच कर्तव्य बजावत नसल्याने या वाहनधारकांचे चांगलेच फावले आहे...
कर्णकर्कश्श आवाज करत मध्येच बॉम्बचे आवाज काढणाऱ्या अशा वाहनधारकांवर कारवाई होणार की नाही असा प्रश्न सांगलीकर विचारत आहेत. पुणे, मुंबई सारख्या शहरात अशी वाहने जप्त करून त्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढून त्यावर बुलडोझर फिरवण्याचे धाडस तेथील अधिकाऱ्यांनी दाखवले आहे. सांगलीतील संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी असे धाडस दाखवतील का असाही प्रश्न नागरिक विचारत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.