ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानाकरिता कामगारांना भरपगारी सुट्टी वा दोन तासांची सवलत
सांगली दि. 16 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदान होणार आहे. या दिवशी मतदार असलेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी वा दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे सहायक कामगार आयुक्त अ. द. गुरव यांनी कळविले आहे.
शासन परिपत्रकानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येत आहे. सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समुह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीमध्ये कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल, मात्र त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.