शिखरजी पर्यटन स्थळ नको, शाश्वत सिध्दक्षेत्र - अहिंसा क्षेत्र म्हणून जाहिर करा.. दक्षिण भारत जैन सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
सांगली दि. २२ : झारखंड राज्यात गिरीडीह जिल्ह्यातील मधुबनस्थित जैन धर्मियांचे पवित्र श्रध्दास्थान श्री सम्मेद शिखरजी - पारसनाथ पर्वताला पर्यटन स्थळाचा दर्जा हा शिखरजी सिध्दक्षेत्राचे पावित्र्य व सुरक्षितता धोक्यात आणणारा आहे.शिखरजीला केंद्र सरकारने पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत दि.५ ऑगस्ट, २०१९ रोजी काढलेल्या अधिसूचनेच्या प्रती या शिखरजीतील स्थानिक व देशातील सर्व प्रमुख जैन संस्थांना देऊन जैन समाजाशी चर्चा न करताच अधिसूचना काढून जैन व अहिंसा प्रेमी भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हा निर्णय अल्पसंख्याक जैन समाजाचा धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे.
या विरुद्ध देशभर संताप व्यक्त होत आहे.देशातील जैन साधू - साध्वी, भट्टारक पिठे, तमाम जैन समाज व्यथित झाला आहे. जैन समाज हा पर्यावरण संरक्षणात कायम पुढाकार घेत असतोच. वन्यजीव रक्षणात हा समाज कायम दयाभाव कृतीतून व्यक्त करतोच. त्यामुळे तातडीने ही केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने काढलेली अधिसूचना मागे घ्यावी. झारखंड सरकारने शिखरजी पर्वत पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी कोणतीही कृती करु नये. पर्यटन स्थळ म्हणून जाहिर केल्याने या पवित्र क्षेत्राचे पावित्र्य व सुरक्षितता धोक्यात येणाऱ्या अपवित्र घटना नाकारता येणार नाहीत.पर्यटन स्थळ हा दर्जा रद्द करुन शिखरजी - पारसनाथ संपूर्ण पर्वत हे पर्वताच्या परिक्रमा क्षेत्रासह" जैन सिध्दक्षेत्र - अहिंसा क्षेत्र" * म्हणून केंद्र व झारखंड सरकारने जाहिर करावे
सांगली जिल्हा प्रशासनाने दक्षिण भारत जैन सभेची ही मागणी केंद्र व झारखंड सरकार कडे 'अती महत्त्वाचे व तात्काळ' सदराखाली शिफारस करुन पाठवावी. अशा आशयाचे निवेदन आज जैन समाजातर्फे दक्षिण भारत जैन सभेने अध्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना दिले.
मा. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे मान्य केले. यावेळी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, महामंत्री प्रा. एन.डी.बिरनाळे , ट्रस्टी शांतीनाथ नंदगावे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी समितीचे सदस्य प्रशांत पाटील मजलेकर, महिला महामंत्री कमल मिणचे, महिला परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा पाटील यड्रावकर, जैन महिलाश्रमच्या चेअरमन अनिता पाटील, छाया कुंभोजकर, अनिता विनोद पाटील, श्री जैन श्वेतांबर पार्श्वनाथ देहरासर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषभाई शहा, ट्रस्टी धीरज दोशी, विपुल मेहता, महावीर भन्साळी व स्वप्निल शहा उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.