Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुभंगलेले ओठ, टाळू आजाराच्या शस्त्रक्रिया मोफत पूर्ण होणार.

 दुभंगलेले ओठ, टाळू आजाराच्या शस्त्रक्रियेकरीता 31 बालकांची तपासणी पुढील महिन्यात शस्त्रक्रिया मोफत पूर्ण होणार

             - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे


दुभंगलेले ओठ, टाळू आजाराच्या शस्त्रक्रियेकरीता 31 बालकांची तपासणी
पुढील महिन्यात शस्त्रक्रिया मोफत पूर्ण होणार

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 31 बालकांकरिता दि. 29 डिसेंबर 2022 रोजी प्रभु क्लिनिक डॉ. महेश प्रभु कोल्हापूर यांच्या पथकांमार्फत प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले. तपासणीअंती शस्त्रक्रियेकरीता पात्र ठरलेल्या व शस्त्रक्रियेस शारिरिकदृष्ट्या तंदुरूस्त असणाऱ्या 29 बालकांच्या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तसेच स्माईल ट्रेन या योजनेतून जानेवारी महिनाअखेर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून दुभंगलेल्या टाळूच्या दोन गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मुंबई येथील एस.आर.सी.सी. रूग्णालय येथे पूर्ण करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. या शस्त्रक्रियेकरीता खाजगी रूग्णालयात प्रति शस्त्रक्रिया 90 हजार ते 1 लाख रूपये पर्यंतचा खर्च करावा लागतो. अशाप्रकारे एकूण 30 लाख रूपये रक्कमेच्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. शस्त्रक्रिया शिबीरांकरिता जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे मार्गदर्शन लाभले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांच्या सुचनेनुसार जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, डी.ई. आय.सी. अधिकारी व कर्मचारी यांनी शिबीराचे नियोजन केले.


राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी वैद्यकिय पथकांमार्फत करण्यात येत आहे. वैद्यकिय अधिकारी महिला व पुरूष, औषधनिर्माता व परिचारीका अशा चार जणांच्या पथकांमार्फत लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. प्रति 25 हजार बालकांसाठी एक याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी एकूण 32 वैद्यकिय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. किरकोळ आजार असणाऱ्या लाभार्थ्यांना जागेवरच औषधोपचार करण्यात येतात. तपासणीमधून हृदय रोग बालके तसेच इतर आजारांमध्ये अस्थिव्यंग, कान-नका-घसा, हार्निया, फायमोसिस, अनडिसेंडेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालके संदर्भित करण्यात येतात. दुंभगलेले ओठ व टाळू या जन्मजात आजारामुळे बालकांना अन्न गिळण्यामध्ये, बोलण्यामध्ये, श्वास घेण्यामध्ये प्रचंड अडथळा निर्माण होतो. लवकरात लवकर शस्त्रक्रिया न केल्यास कुपोषण व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बालके मोठ्या प्रमाणात अशक्त होवून इतर किरकोळ आजारास वारंवार बळी पडतात. वेळेत, यशस्वी व पूर्णपणे मोफत केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे बालके सशक्त व अत्यंत सामान्य जीवन जगू शकतात.



 

 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.