गुरुवारी सांगली राहणार बंद!
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशातील महापुरुषांचा वारंवार अपमान केला जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने गुरुवारी सांगली बंदचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सांगली शहर उद्या बंद राहणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्याविरोधात सर्व पुरोगामी संघटनांच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली होती. भाजप चले जावो, चंद्रकांत पाटील मुर्दाबाद, कोशारी चले जावो, आशा घोषणा देऊन निषेध व्यक्त करुन महामानवांच्या अवमानाचा निषेध म्हणून गुरुवारी सांगली बंदचा इशारा देण्यात आला आहे. या बंदला सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय, उद्योग बंद ठेवावेत, सर्व पुरोगामी पक्ष संघटनांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई, डॉ. संजय पाटील, नितीन गोंधळे, किरण राज कांबळे, ॲड. के. डी. शिंदे, अॅड. अजित सूर्यवंशी, ॲड. तेजस्विनी सूर्यवंशी, दादासाहेब ढेरे, नितीन चव्हाण, मुनीर मुल्ला, प्रवीण नांदवडेकर, प्रशांत पवार, आशा पाटील, प्रणिता पवार, सुरेश भंडारे, तोहीद शेख, अमृतराव सूर्यवंशी, राहुल पाटील यांच्यासह सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.
गुरुवारी सकाळी दहा वाजता स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापासून पदयात्रा सुरु होणार आहे. राजवाडा चौक, कापड पेठ, मारुती रोड, डॉ. आंबेडकर पुतळा येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तिची सांगता होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.