शिवसेनेसोबत जाण्यास आम्ही तयारच: पण आघाडीत घेण्यास काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनच विरोध
नाशिक-महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसचा विराेध आहे. शिवसेनेबराेबर युती करण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याच निर्णयावर सर्व काही अवलंबून असेल असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश) आंबेडकर यांनी नाशिकमध्ये शनिवारी (१७ डिसेंबर) सांगितले.
नाशिकच्या ईदगाह मैदानावर शनिवारी धम्म परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्रवादी व काँग्रेस या दाेघांनाही गरीबांना सत्तेत येऊ द्यायचे नाही ही विचारधारणा आहे. मुंबईत निघालेला माेर्चा हा शिवसेनेचाच हाेता. काँग्रेस व राष्ट्रवादी फक्त नावाला होते. महाविकास आघाडीत आम्हाला घेण्याबाबत मतभेद असल्याने या मोर्चात सहभागी झालो नाही, असेही आंबेडकरांनी सांगितले. धम्म परिषदेत आपल्या ४८ मिनिटांच्या भाषणात त्यांनी संघ व पंतप्रधान माेदी यांच्यावर सडकून टीका केली. सत्तेचा गैरवापर करत काेणत्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चाैकशा लावण्यात आल्या आहेत.
देशात पंतप्रधानांच्या ताेडीचा दुसरा माणूसच नाही असे बिंबवले जात आहे आणि दुर्दैवाने आपण सर्व त्याला बळी पडताे. आपल्याला पंतप्रधान नव्हे तर खासदार निवडून देण्याचा अधिकार आहे आणि खासदारांना त्यांचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे. मात्र ही व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांचे थेट पंतप्रधान निवडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हळूहळू आपला मेंदू ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालला आहे. असे झाल्यास या देशात न्हावी, कुंभार, लाेहार, आदिवासी, काेळी, भटके कधीच पंतप्रधान हाेणार नाहीत. म्हणजेच तुमचा पंतप्रधान हाेण्याची संधी कायमची गेली. खासदारांची संधी काढून तुम्हाला कायमचे बंदिस्त केले जाईल, असेही आंबेडकरांनी सांगितले. धम्म परिषदेस बाैद्ध भिक्खूंसह आंबेडकरांचे अनुयायी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
चीन, अमेरिकेचे पेमेंट गेट वे बंद करून दाखवा
चीनला पंतप्रधान नरेंद्र माेदी दादा समजतात. तुमची जर ५६ इंच छाती आहे तर चीन व अमेरिकेचे पेमेंट गेट वे बंद करून दाखवा. चीनाबाबत त्यांचे सैन्य पिटाळून लावल्याची खाेटी माहिती दिली जाते. संसदेत आपल्या खासदारांनी त्याबाबतचे प्रश्न विचारल्यास खरा मुद्दा सांगितला जात नाही. प्रत्यक्षात चिनने आपली २५०० चौरस फूट जागा ताब्यात घेतल्याचा गाैप्यस्फाेटही त्यांनी केला. त्यामुळे आता आंबेडकर यांच्या टीकेवर भाजप काय प्रत्युत्तर देते, हे पहावे लागणार आहे.
माेदी, भागवतांना तुरुंगात बघायचे असेल तर सत्ता बदला
पंतप्रधान नरेंद्र माेदी सर्वात माेठे चाेर आहेत. पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन युद्धाची भाषा करणाऱ्या माेहन भागवत यांच्याकडे शस्त्र परवाना आहे का, हे अगाेदर त्यांनी जाहीर करावे. हे दाेघेही आराेपी आहेत. असे मी म्हणत नाही तर न्यायालयाने माेदींच्या वकिलांना सांगितलेले आहे. तुम्हाला जर या दाेघांनाही जेलमध्ये बघायचे असेल तर सत्ता बदलावी लागेल. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन आंबेडकर यांनी केलेे. दरम्यान या धम्म परिषदेला राज्यभरातून कार्यकर्ते आणि वंचितचे कार्यकर्ते आले होते. या वेळी त्यांच्या हातातमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर आणि पोस्टर्स पहायला मिळाले. उपस्थित घोषणाबाजीही करत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.