छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना कायमचा धडा शिकवणार : शरद पवार
मुंबई : आज 350 वर्ष झाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांचं नाव घेतलं जात आहे. पण, राज्याच्या सरकारमधील मंत्री हे शिवरायांबद्दल वाटेल ते विधान करतो, अन्य कुणी काही तरी बोलतो. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. आज लोकशाही मार्गानं त्यांना कायमचा धडा शिकवायचा असून स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेत्यांकडून महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य, तसंच महाराष्ट्र राज्याला भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आज महाविकास आघाडीतर्फे मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला संबोधित करताना पवार बोलत होते.
या मोर्चात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस तसंच महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील सहभागी झाले आहे. शरद पवार म्हणाले, आज हा मोर्चा वेगळ्या स्थितीचं दर्शन घडवत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर या मुंबईत लाखोंच्या संख्येनं मोर्चे निघाले होते. मराठी भाषिकांचं राज्य यावं त्यासाठी लढा दिला होता. पण, अजूनही मराठी भाषिकांवर अन्याय केले जात आहेत.
बेळगाव आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेली गाव राज्यात सामील झाली पाहिजे, अशी मागणी पवारांनी केली. आज राज्यातून महाराष्ट्राच्या सन्मानासाठी लाखो लोक एकत्र आले. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती लोक वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणण्याचं काम शिवरायांनी केलं, असेही पवार यावेळी म्हणाले.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत, त्यांच्याबाबत बेताल वक्तव्ये करण्याचं काम सुरू आहे. ही वक्तव्ये करणाऱ्या राज्यपालांना हटवण्यात यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्चामध्ये तेही बोलत होते. पवार म्हणाले, 'चूक झाल्यानंतर माणूस माफी मागतो. पण, चूक एकदाच होत असते. राज्यपाल बोलल्यानंतर दुसरे मंत्री बोलतात. त्यांना जनाची नव्हे तर मनाची वाटायला पाहिजे. संविधान काय सांगतो याचा विसर त्यांना पडलेला आहे.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.