आव्हाडांपासून मुख्यमंत्री पाच-दहा फुटांवरच, विनयभंग झाला नाही, हे त्यांनीच सांगायला हवं: अजित पवार
मुंबई: जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत जो काही प्रकार घडला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी पाच ते दहा फुटांवर उभी होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांनीच त्याठिकाणी विनयभंगासारखा प्रकार घडला नाही, हे समोर येऊन स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. मी या प्रकाराचा व्हिडिओ स्वत: पाहिला. त्याठिकाणी पोलीस अधिकारीही उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड सगळ्यांना बाजूला व्हा, सांगत होते. त्यांनी एका भगिनीला थोडसं बाजूला करुन ते स्वत: गेले. यापेक्षा जास्त काहीही झालेले नाही. हा प्रकार घडला तेव्हा मुख्यमंत्री पाच ते दहा फुटांवर होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं पाहिजे, असं काही घडलेलं नाही. तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. कशाही पद्धतीने तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही राज्यातील १३ कोटी जनेतेचे प्रतिनिधी आहात, असे अजित पवार यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कळव्यातील एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या आरोपांमुळे व्यथित झालेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यासंदर्भात भाष्य करताना अजित पवार यांनी म्हटले की, जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. हुकूमशाही आणि दडपशाही पद्धतीने पोलिसांचा कारभार सुरु आहे. माझी जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, त्यांनी अशाप्रकारे राजीनामा देऊ नये. राजीनामा देण्याचा विचार मनातून काढून टाकावा, असे अजित पवार यांनी म्हटले.
माझ्या पाहण्यात आलं की, व्हिव्हियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपट बंद पाडताना मारहाण झालेली व्यक्तीच सांगत आहे की, जितेंद्र आव्हाड यांनीच मला वाचवले. तरीही पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन रात्रभर जेलमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी आव्हाडांना जामीन मिळाला. कायद्याचा आदर केला पाहिजे,त्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले.
गर्दीत धक्का लागणे म्हणजे विनयभंग ठरत नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली. आम्हीदेखील एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा थोडफारं जॉसलिंग होतं. मी भारत जोडो यात्रेसाठी गेले होते, तेव्हाही असा प्रकार घडला. तेव्हा अनेक मुलं माझा हात ओढत होती. मी आता त्याला विनयभंग म्हणायचा का? ते लोकांचे आपल्यावर असलेले प्रेम असते. महाराष्ट्रात लोकं बंदुकी घेऊन महिलांना शिव्या घालतात. तेव्हा आम्ही विनयभंगाच्या केसेस घालत नाही. हा आपला मार्ग नाही, हे लक्षात ठेवून, व्यावसायिकपणे वागत आम्ही दुसऱ्या मार्गाने जातो. मी मध्यमवर्गीय आणि सुसंस्कृत कुटुंबात वाढले आहे. माझ्या आईने मला, एक गोष्ट शिकवली आहे की, गर्दीमध्ये गेलीस आणि धक्का खायची वेळ आली तर बाजूला उभी राहा, दोन मिनिटं उशीर झाला तरी चालेल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.