कीर्तिकरांच्या हातात शिवसेनेच्या नाड्या?
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाला कायमचा जय महाराष्ट्र करून गजानन कीर्तिकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. कीर्तिकरांच्या रुपाने ठाकरे गटाचा तेरावा खासदार फुटलाय. शिवसेना खरी कुणाची, हा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापुढं प्रलंबित आहे. नेमकं हेच टायमिंग साधून कीर्तिकरांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.. त्यामुळे ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय.
कीर्तिकर करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
गजानन कीर्तिकरांच्या रुपानं मुंबईतील तीनपैकी दुसरा खासदार शिंदे गटाच्या गळाला लागलाय. कीर्तिकर हे शिवसेनेचे नेते होते. शिवाय त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश आहे. त्यामुळे कीर्तिकरांच्या बंडामुळं राष्ट्रीय कार्यकारिणीतही फूट पडलीये. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीचे ते अध्यक्ष आहेत. स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक भूमीपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे. बँका, विमा, विमान कंपन्या, केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये समितीचा दबदबा आहे. म्हणूनच कीर्तिकरांच्या बंडामुळे लोकाधिकार समितीतही फूट अटळ आहे
तब्बल चारवेळा आमदार, दोनवेळा मंत्री, दोनवेळा खासदार, नेते, स्थानीय लोकाधिकार समिती अध्यक्ष अशी कीर्तिकरांची आजवरची कारकीर्द आहे. त्यामुळे ठाकरे गटानं आणखी एक खासदार गमावला, एवढ्यापुरतं हे प्रकरण मर्यादित नाही, तर खरी शिवसेना कुणाची, या वादात कीर्तिकरांची भूमिका निर्णायक ठरणाराय. यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेवरील दाव्याला आणखी बळ मिळेल, हे नक्की.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.