ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन..
मराठी-हिंदी मनोरंजनक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 'सरफरोश', 'गांधी', 'वास्तव' अशा अनेक सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. सुनील शेंडे राहत्या घरी चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. विलेपार्ले येथील राहत्या घरीच रात्री एक वाजता त्यांचे निधन झाले आहे. आज सुनील शेंडे यांच्या पार्थिवावर पारशीवाडा याठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमित दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सुनील शेंडे यांनी अनेक हिंदी-मराठी सिनेमांत वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळेच त्यांना हरहुन्नरी अभिनेता म्हटले जाते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि भारदस्त आवाजामुळे त्यांना पोलीस, राजकारणी अशा भूमिका जास्त मिळाल्या आहेत.
नव्वदच्या दशकात सुनील शेंडे खूप लोकप्रिय होते. 'निवडुंग', 'मधुचंद्राची रात्र', 'जसा बाप तशी पोर', 'ईश्वर', 'नरसिम्हा' अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत सुनील शेंडे यांनी काम केलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही वेगळी छाप सोडली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ते मनोरंजनसृष्टीपासून दूर होते.
सुनील शेंडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योती सुनील शेंडे, दोन मुलं ऋषिकेश शेंडे आणि ओमकार शेंडे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुनील शेंडे यांनी सिनेमांसह अनेक नाटकांत आणि मालिकांमध्येदेखील काम केलं आहे.
'गांधी' सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण!
'गांधी' या सिनेमाच्या माध्यमातून सुनील शेंडे यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ते डाकूच्या भूमिकेत दिसले होते. 'पहला प्यार' या गाजलेल्या मालिकेचादेखील सुनील शेंडे भाग होते. मराठी रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटकांत काम केलं आहे. अष्टपैलू अभिनेते म्हणून ते ओळखले जायचे. आपल्या बहरदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे सुनील शेंडे यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते शोक व्यक्त करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.