बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा - देवेंद्र फडणवीस यांची ईडीमार्फत चौकशी होणार..
भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दणका दिला. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील फडणवीस यांच्या सहभागाबाबत अॅड. सतीश उके यांनी केलेल्या तक्रार अर्जाची गंभीर दखल घेत न्यायालयाने या प्रकरणात ईडीला सखोल चौकशीचा आदेश दिला आहे. उके यांनी त्यांच्या अर्जामध्ये फडणवीस यांच्याबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे फडणवीस मोठय़ा संकटात सापडण्याची दाट शक्यता आहे.
15 वर्षांपूर्वी अॅड. उके यांनी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला. त्यातील राजकीय लागेबांधे उघडकीस आणले. त्यावेळी घोटाळय़ातील मास्टरमाइंड धरमदास रामाणी यांना वाचवण्याचा खटाटोप देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला. याचदरम्यान उके यांच्याविरोधात धरमदास रामाणी यांनी खंडणीची तक्रार दाखल केली. नंतर त्या तक्रारीत तथ्य नसल्याचे तपासात सिद्ध झाले आणि पोलिसांनी 'बी समरी' अहवाल दाखल केला. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी 15 वर्षांपूर्वीच्या खंडणीच्या तक्रारीचा फेरतपास करीत उके यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
यावेळी उके यांनी बनावट स्टॅम्प पेपर घोटाळासंबंधित आपल्या तक्रारीचे काय झाले, अशी विचारणा केली. त्यावर संबंधित घोटाळा दडपण्याचेच प्रयत्न सुरू झाले. ते प्रकरण मागे टाकून ईडीने अलीकडेच रामाणी व देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील कारनाम्यासंबंधीत कागदपत्रे आपल्या घरातून जप्त केली. या सर्व कारनाम्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करीत उके यांनी मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जाची विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी गंभीर दखल घेतली आणि बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ाचा कथित मास्टरमाइंड धरमदास रामाणी, देवेंद्र फडणवीस व नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची सखोल चौकशी करण्याबाबत ईडीच्या दिल्लीतील संबंधित विभागाला आदेश दिला. यावेळी न्यायालयात ईडीचे सहाय्यक संचालक एस. परमेश्वरन हे उपस्थित होते. उके यांच्या अर्जाची मूळ प्रत तपास यंत्रणेकडे प्राप्त झाली, यासंदर्भात परमेश्वरन यांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर स्वाक्षरीही केली. अर्जदार उके सध्या आर्थिक अफरातफर प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात पैद आहेत.
आर. आर. पाटील यांच्या काळात फडणवीसांचा डाव निष्फळ
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ाचा मास्टरमाइंड रामाणीला वाचवण्याच्या हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे उके यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी पत्र लिहिले होते, मात्र त्यावेळी आर. आर. पाटील यांनी उके यांच्याविरोधातील पत्र पोलिसांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले होते. त्यामुळे फडणवीस यांचा कुटील डाव फसला होता.
उके यांच्या अर्जातील गंभीर आरोप
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे माझ्या घरात असल्याचे समजल्यानंतर ईडीने 30 मार्च रोजी झडतीचा आदेश जारी करून दुसऱ्याच दिवशी पहाटे घराची झडती घेऊन अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या फाइल्स जप्त केल्या.
जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संबंधित तक्रारी तसेच बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ाशी संबंधित कागदपत्रांचा समावेश होता. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील रामाणी, फडणवीस आणि अमितेश कुमार यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी माझ्याविरोधात आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रामाणीने घोटाळय़ातील रक्कम फडणवीस यांच्या राजकीय कामांवर खर्च केली. यासंबंधी आपल्याकडे पुरावेही आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फडणवीस यांच्याविरोधात अनेक आरोप करीत तक्रार केली होती, मात्र नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याबाबतीत लपवाछपवी करीत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ातील रकमेतून फडणवीस यांच्या राजकीय कामांवर करण्यात आलेल्या खर्चासंबंधी आर्थिक अफरातफर तसेच फडणवीस यांचे गुन्हे लपवण्यासाठी करण्यात आलेला खटाटोप याची ईडीने सखोल चौकशी करावी.
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळय़ात फडणवीसांचे लागेबांधे असल्याचा आरोप उके यांनी केला आहे. त्यांच्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने ईडीला चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावून निष्पक्ष तपास करेल, अशी अपेक्षा आम्ही बाळगतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.